Round Table India
You Are Reading
कास्टिस्ट मुंबईस्पिरीट
0
Assertion

कास्टिस्ट मुंबईस्पिरीट

somnath waghmare

 

Somnath Waghmare

somnath waghmareमुंबई… नो नो, बॉम्बे! स्वप्ननगरी!!

माझं गिरणी कामगार कुटुंब ठीक २५ वर्षांपूर्वी मुंबई शहरातून खेड्यात स्थलांतरीत झालं होतं. गिरण्या बंद पडल्यामुळे. पण मी आज याच शहरामध्ये भारतात नावाजलेल्या टाटा समाजविज्ञान संस्थेत एमफिल–पिएचडी करत आहे. मुंबईबद्दल एक समज खुप प्रचलित आहे — ‘मुंबईचं स्पिरीट’. ह्याचा अर्थ असा की शहरावर कोणतीही आपत्ती आली तरी सगळे लोक मदतीला धावून येतात आणि दुसऱ्या दिवशी सगळं सुरळीत चालू होतं. पण ह्या मुंबई स्पिरीटपासून दलित समाज अजूनही अस्पृश्यच आहे हे यावर्षी मुंबईकरांनी दाखवून दिलं.

ज्या माणसाने हजारो वर्षे जातीवर्णव्यवस्थेत बंदिस्त असलेल्या समाजाला त्या गुलामीतून मुक्त करून सांविधानिक मानवी हक्क मिळवून दिले, त्या बाबासाहेबांची ६ डिसेंबर पुण्यतिथी असते. भारतातल्या मुलतत्ववादी सवर्णांसाठी विजय दिवस कारण त्यांनी बाबरी मशीद याच दिवशी पाडली, तर मुस्लिमांसाठी ब्लॅक डे. मी कायम विचार करतो की बाबरी मशीद पाडण्यासाठी हाच दिवस का बरं निवडला असेल? मागच्या वर्षी जयललिता यांचं निधनसुद्धा याच दिवशी घोषित करण्यात आलं होतं. या पाठीमागे खुप मोठं धार्मिक-जातीय वर्चस्वाचं राजकारण आहे. मनुस्मृतीला मानणारा खूप मोठा आजारी सवर्ण समाज आज हि भारतात आहे ज्याची लोकसंख्या २५ % आहे पण इथल्या सगळ्या पॉवर स्टक्चर वर त्याच वर्चस्व आहे . आणि त्याबद्धल कसलीही लाज या समाजातला अजूनतरी नाही , हाच समाज आरक्षण विरोधी आहे आणि आंबेडकर द्वेष्टी पण , हा काही अल्पसंख्य लोक आहेत या समाजात जे हे सर्व नाकारतात .

६ डिसेंबर, १४ एप्रिल, १ जानेवारी, १४ अॉक्टोबर हे जगभरतल्या फुले-आंबेडकरवाद्यांच्या जीवनातील महत्वाचे दिवस आहेत. ६ डिसेंबर १९५६ ला बाबासाहेबांचं निर्वाण झाल्यापासून दरवर्षी किमान ५० लाख लोक देशभरातून आपल्या दिग्विजय नेत्याला अभिवादन करण्यासाठी मुंबईमधील दादर चैत्यभूमीला येत असतो. भारतात ५० लाख लोक एका ठिकाणी जमणे काही नवीन नाही, पण कुंभमेळ्याला ५० लाख लोक जमणे आणि चैत्यभूमी, दीक्षाभूमी किंवा भीमा कोरेगावला ५० लाख लोक जमणे यात फरक आहे. तो फरक भक्त आणि अनुयायी असा आहे. भारतात इतके लोक ना गांधींसाठी, ना नेहरूंसाठी, ना टिळकांसाठी त्यांच्या मृत्युनंतर कधी जमले होते ना कधी जमतील .

cbs 1

दरवषी ३ डिसेंबरपासूनच भारतभरातून लोक चैत्यभूमीवर यायला सुरवात होत असते. लोक मुख्यत्वे ग्रामीण भागातील असतात. मुंबई महानगरपालिका काही सुविधा पुरवते पण त्या खुपच तोकड्या असतात. यावर्षीसुद्धा त्याच संख्येने जनसमुदाय बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला आला होता, पण अचानक ४ तारखेला मुंबईत पाऊस सुरु झाला आणि महानगरपालिकेने ज्या मैदानावर लोकांची राहण्यासाठी सोय केली होती तो सगळा मंडप पावसामुळे कोसळून पडला. पुस्तकांची दुकानेही उभी राहू शकली नाहीत. दरवर्षी किमान २ कोटींची पुस्तके इथून विकली जातात.

cbs 3

अचानक आलेल्या पावसामुळे लोकांच्या राहण्याची प्रचंड गैरसोय झाली. जवळच्या काही शाळा खुल्या करण्यात आल्या पण तेवढी सोय अपुरी होती. काही लोक रेल्वे स्टेशनवरच थांबले तर काही आल्या ट्रेनने परत गेले. ही अचानक आलेली आपत्ती होती. सरकाने वादळ येऊ शकते म्हणून दुसऱ्या दिवशी सगळ्या शाळांना सुट्टी दिली. पण ज्यावेळी हा मुंबईबाहेरचा आंबेडकरी समूह पावसात भिजत होता, एक रात्र राहण्यासाठी जागा शोधत होता, तेव्हा सरकार किंवा मुंबई स्पिरिटवाले कुठेही दिसले नाहीत.

cbs 5

कदाचित त्यांना आनंद झाला असेल. त्यांचं दादर या दिवसांमध्ये घाण होतं. या दिवसांत त्यांना खूप त्रासाला सामोरं जावं लागतं. मी जेव्हा दादर परिसरात फिरत होतो तेव्हा या भागातील बहुतेक घरं बंद होती. घरातले दिवेही बंद होते. याचा अर्थ बहुतेक लोक अॉफिसला सुट्टी घेऊन बाहेरगावी गेले असतील. कदाचित आपण जातीयवादी आहोत हे सांगण्यासाठीच ते असं करत असतील. जे लोक शहरात जातीव्यवस्था नाही असं म्हणतात त्यांनी थोडं जातीच्या घेटोतुन बाहेर पडून बघावं म्हणजे
दिसेल आपण कस जातीला एन्जॉय करतोय . या देशात जात तुमच्या क्लास मध्ये कोना शेजारी बसण्यापासून , मैत्री , रिलेशन नोकरी ते लग्नापर्यंत सगळीकडे पाळली जाते .तुमचे शहर हेच लोक रोज स्वच्छ करतात हे कदाचित ते विसरत असतील. मला माझी पत्रकार मैत्रिण सुकन्या दुसऱ्या दिवशी सांगत होती कि ५ वर्षांपूर्वी या सवर्ण लोकांना कसा या दिवसात त्रास होतो यावर टाईम्स ऑफ इंडियामध्ये बातम्या येत असत. इंग्लिश मीडियातल्या बहुसंख्य पत्रकारांना फक्त इंग्लिश बोलता येतं कारण वर्ग–जात प्रीव्हीलेज, बाकी सामाजिक–राजकीय अक्कल शून्य असते. म्हणून तर भारतात लोक मीडियाला लोक गंभीरतेने घेत नाहीत.

cbs 9या सगळ्या परिस्थितीमध्ये ना मुंबई स्पिरीटवाले आंबेडकरी समूहाला मानवता म्हणून मदत करायला पुढे आले, ना कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, ना प्रशासन, ना प्रसारमाध्यमे. फक्त दिसत होते ते समूहातील तरुण-तरुणी, जे भर पावसात, लोकांना, लहान मुलांना जेवणापासून, राहण्याच्या सोयीपर्यंत मदत करत होते, सोशल मीडियावरून लोकांना मदतीचे आवाहन करत होते, प्रशासनाबरोबर भांडत होते, म्हणत होते “हेच लोक जर कुंभमेळ्यासाठी जमले असते तर तुम्ही काय केलं असतं?” पण ते विसरत होते महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे ज्यांना कुंभमेळ्याला जाणारा समूह हवा आहे, परिवर्तनाचा, समतेचा विचार करणारा समूह नाही.

cbs 11

मी जेव्हा चैत्यभूमीवरून माझ्या कॉलेजकडे परतत होतो तेव्हा टॅक्सीमध्ये रेडिओवर फडणवीस सरकार कसं आंबेडकरप्रेमी आहे याचं गुणगान सुरु होतं. लंडनमध्ये स्मारक बांधणार वगैरे वगैरे. वाटत होतं सरकार आणि मुंबईकरांनी दोन दिवस पावसामुळे हाल झालेल्या बाबासाहेबांच्या लोकांवर थोडं जरी प्रेम दाखवलं असतं तरी बरं वाटलं असतं. मग आम्हाला पण वाटलं असत मुंबई स्पिरिट वगैरे काहीतरी खरंच असतं.

cbs 4

पण पावसामुळे इतका त्रास होऊनही ६ डिसेंबरच्या दिवशी लाखोंच्या संख्येने लोक अभिवादनासाठी जमले होते जसे दरवर्षी , जमतात. कदाचित ब्राह्मण्यवाद्यांना हा संदेश देण्यासाठी कि हे आंबडेकर युग आहे. आता हा कारवा थांबणार नाही, तो पुढेच जाणार… कितीही ऊन, वारा, पाऊस आला तरी.

cbs 7

~~~


Somnath Waghmare is a Documentary filmmaker and Research Scholar at Tata Institute of Social Sciences, Mumbai.