Round Table India
You Are Reading
नितीन आगे हत्याकांड – खर्डा येथे नितीन च्या पालकांशी साधलेला संवाद
0
Features

नितीन आगे हत्याकांड – खर्डा येथे नितीन च्या पालकांशी साधलेला संवाद

nitin family2

 

Bhagyesha Kurane

नितीन आगे हत्यांकाड प्रकरणी पुण्यातील काही विद्यार्थ्यांनी खर्डा या गावाला  भेट दिली व नितीनच्या आई वडिलांशी या घटने संदर्भात संवाद साधला.ह्या हत्यांकाडाचा तपास एकूणच कशाप्रकारे झाला, आरोपी निर्दोष होण्यामागील काय कारणे  होती, सरकारची भूमिका, इत्यादी बाबी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दलित हत्यांकाडाच्या केसेस हाताळत असताना सरकारी अनास्था कशाप्रकारे कार्यरत असते हे त्यांच्याशी केलेल्या संवादात अतिशय तीव्रतेने स्पष्ट होते.

एक अशिक्षित माय-बाप आजवर आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी संघर्ष करत होते.पण येथील जातीयवादी व्यवस्थेने त्यांच्या मुलाला शिक्षण घेण्यापासून रोखले आणि जातीय हीनतेच्या भावनेतून त्याचा  खून केला. आज तेच माय बाप इतर कोणत्याही मुलामुलीवर ही वेळ येऊ नये म्हणून लढत आहेत, ते ही सनदशीर मार्गाने. नितीन च्या कुटुंबियांशी केलेला हा सर्व संवाद मुलाखत स्वरूपात आम्ही आपल्या समोर मांडत आहोत.

nitin family2

 प्रश्न – आपले मूळ गाव कोणते व खर्डा या गावात आपण किती वर्षे वास्तव्य करत आहात ?

उत्तर– राजू आगे (नितीन चे वडील) –आमचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील धनजरवडा हे आहे.आम्ही यापूर्वी खर्डा पासून तीन किलो मीटरवर असणाऱ्या वाडीवर रहात होतो. पण गेली पंधरा वर्षापासून आम्ही खर्डा येथे राहात आहोत.

प्रश्न – आपण इथे गावापासून दूर, वेशीजवळ राहता, याचे कारण सांगू शकाल का?

उत्तर – आम्ही स्थलांतरीत आहोत.हातावरच पोट.यामुळे जागा घेऊन  स्वतःच घर बांधण्याची पत नव्हती. शिवाय इथून मुलाची शाळा जवळ होती .यामुळे गावाबाहेरच सरकारी जागेवर पत्रामारून आम्ही रहायला सुरवात केली.

प्रश्न – तुम्ही काय व्यवसाय करता? तुमच्याकडे काही शेती आहे का?

उत्तर – मी खड़ी मशीन वर कामाला आहे व नितीन ची आई शेतंमजूर म्हणून काम करते.आम्हाला शेती नाही.

प्रश्न – गावात SC-ST वर्गाची लोकसंख्या किती असेल? तुमचे व गावातील SC समाजाचे संबंध कसे आहेत ?

उत्तर – आम्ही स्थलांतरीत…गावाच्या बाहेर घर… शिवाय रात्रंदिन खडी मशीन वर काम.यामुळे गावातील दलित समाजाशी फारसा संबध कधी आला नाही.रोजच्या मिळकतीवर घरात चूल पेटायची.यामुळे गावातील जयंती – व्याख्यान अशा कार्यक्रमात कधी सहभागी होऊ शकलो नाही.

nitin family1

 प्रश्न -गावात बहुतांश दलित समाजातील जनतेचा व्यवसाय काय आहे?

 उत्तर – दलित समाजातील बहुतांश लोक शेतमजूर आहेतव समाजातील काही लोकांकडे शेती आहे पण शेती कोरडवाहू असल्याने जास्त उत्पन्न येत नाही.

प्रश्न – सर्वाधिक शेती कोणत्या समाजाकडे आहे ?

उत्तर – सर्वात जास्त शेती मराठा समाजाकडे आहे व त्यानंतर वंजारी समाजाकडे आहे.

प्रश्न – ही घटना घडण्या अगोदर गावात कोणत्या घटकांचा दबाव असायचा ?

उत्तर – यापूर्वी गावात मराठा समाजाचा दबाव असायचा.कारण त्यांची लोकसंख्या जास्त आहे.शेती भरपुर आहे. पैसा आहे.

आता नितीन बद्दल बोलूया…

प्रश्न – तुम्हाला एकूण मुले किती आहेत आणि नितीन रयत शिक्षण संस्थेमध्ये किती वर्षांपासून  शिक्षण घेत होता ?

उत्तर – आम्हाला एकूण तीन मुली व एक मुलगा.नितीन तिसरा.नितीन च्या पाठीवर एक मुलगी आहे. नितीन इयत्ता सहावीपासून रयतच्या शाळेत शिकत होता.अभ्यासात पोर हुशार होत.शिक्षण घेत असतानाच तो मोटरसायकल च्या गॅरेज वर मजुरी पण करायचा. बारावीपर्यंत इथे गावात शिक्षण झाले की आम्ही त्याला त्याच्या मावशी कडे शिक्षणासाठी पुण्याला पाठवणार होतो.मी अशिक्षित आहे पण मुलाला खूप शिकवायची आमची ईच्छा होती.

nitin family4

 प्रश्न – ज्या दिवशी नितीन ची हत्या झाली त्या दिवशी काय-काय घडले हे सांगू शकता का?

उत्तर – रेखा आगे (नितीन ची आई).रविवारी रात्री नितीन मला म्हणाला की ती मुलगी माझा सारखा मोबाईल मागत असते तू शाळेत येऊन मॅडम ला सांग किंवा तिच्या घरी जाऊन आई वडिलांना तरी सांग.मला खूप भीती वाटते.सोमवारी सकाळी नितीन सात वाजता शाळेत गेला.अर्ध्या एक तासाने मी त्याच्या शाळेत गेले तर नितीन शाळेत नव्हता.बाहेर येऊन पोर कुठे आहे असं विचारायला सुरवात केली तर येवल्याच्या वीटभट्टीवर मारायला नेलं आहे अस लोक म्हणू लागले. मग मी तिकडे गेले तर तिकडे तुमच्या पोराला मारलय…डोंगराजवळच्या जंगलात शोधा असं सांगण्यात आल…मी दिवसभर ‘नितीन… नितीन’ अशा हाका मारत जंगलात पळत होते… भितीने पोर लपलेला असल..आईच्या आवाजाने बाहेर येईल अस मला वाटत होत.. पण नितीन काही तिकडे सापडला नाही.

राजू आगे — नितीनची बॉडी दुपारी साडे तीन च्या सुमारास पहिल्यांदा माझ्या भावाला सापडली. गळ्याला फास लावून त्याला जमिनीवर झोपवण्यात आलं होतं. त्याच्या हाता पायावर मारहाणीचे व्रण होते, नाकातोंडातून रक्त येत होतं, बनीयनवर रक्ताचे डाग होते. हाताचं मनगट मोडलेलं.. पाठी पोटावर मुक्का मार होता.

प्रश्न – नितीनच्या गळ्याभोवती फास होता आणि त्यावरून त्याने आत्महत्या केली असावी असा सगळ्यांचा संशय आहे यावरचं आपलं मत मांडाल का?

उत्तर – नितीनची अकरावि पूर्ण झाली होती. बारावीसाठी तो ज्यादाचे तास करत होता… नितीनला हातोड्याने मारत नेताना सगळ्या शाळेने पाहिले आहे. नितीन ला वर्गात घुसून मारायला सुरवात केली तेव्हा शिक्षक म्हणाले, “तुमच काय असेल ते शाळेच्या बाहेर जाऊन करा इथं नको”. शाळेतून त्या मुलीच्या मामाच्या वीटभट्टीवर नेऊन त्याला मारण्यात आलं. दहा-बारा लोकांनी जवळपास तीन चार तास मारहाण करून त्याचा जीव घेतला. शेवटी जेव्हा तो पाणी मागत होता तेव्हा त्याच्या तोंडात काही आरोपींनी लघवी केली.

nitin family5

 प्रश्न – खून घडून गेल्यानंतर पुढे काय घडले ?

उत्तर –खून घडून गेल्यानंतर गळफास लावलेल्या अवस्थेत बॉडी सापडली…पोलीस आले…पोलिसांनी पंचनामा केला..पंचनामा झाल्यानंतर पोलिसांनी पोस्टमॉर्टेम साठी त्याची बॉडी जामखेड ला पाठवली, यानंतर पुढे आरोपींना अटक करण्यात आली.

प्रश्न – या प्रकरणात मुख्य आरोपी कोण आहेत आणि त्यांची आर्थिक-सामाजिक स्थिती काय आहे  याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का?

उत्तर— कथित प्रेम प्रकरणातून नितीन ल मारण्यात आले आहे. यामध्ये मुलगी मराठा समाजची होती व मुलीच्या मामाने व मुलीच्या भावाने इतर अकरा लोकांच्या मदतीने नितीन चा खून केला. यामध्ये काही लोक दारू पिऊन होते तर काही बाल गुन्हेगार आहेत ज्यांची सध्या सुटका झाली आहे.

यामधील मुख्य आरोपी असणारा मुलीचा मामा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता होता. गावात त्यांची कपड्याची दुकाने आहेत. शेती भरपुर आहे. वीटभट्टी आहे त्याच वीटभट्टी वर नितीन चा मारून खून करण्यात आला.

प्रश्न – नितीन ला नेत असताना संपूर्ण शाळेने पाहिले असं तुम्ही म्हणता, आणि तेथील शिक्षक म्हणत आहेत त्याला शाळेच्या मधल्या सुट्टी मध्ये नेण्यात आले आमचा काहीच संबध नाही, हे खरं आहे का ? याबद्दल तुम्ही काय सांगाल?

उत्तर – हे साफ खोट आहे. कारण मी (नितीनची आई ) स्वतः सकाळी साडे-सात, आठ च्या दरम्यान शाळेत गेले होते तर वर्गात नितीन नव्हता व येवल्याच्या भट्टीवर मारायला नेलं आहे हे मला तेथून समजलं.

प्रश्न – नितीन च्या हत्येमागे मुख्य कारण काय असावे असे तुम्हाला वाटते?

उत्तर – नितीन चे त्या पोरी सोबत प्रेम संबध होते हे सर्व खोटं आहे.पोरीचा मामा गावातील पैशानं मोठा माणूस आहे, त्याला गावात धाक निर्माण करायचा होता. त्यात आमचं पोरगं कष्ट करून शिकत होतं, अभ्यासात हुशार होतं… मारून चार पैसे दिल की आम्ही शांत बसू असं त्याला वाटल असावं आणि म्हणूनच त्यानं आमच्या मुलाचा खून केला.

प्रश्न – या घटनेनंतर गावचे जे लोकप्रतिनिधी उदा सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी तुम्हाला काय मदत केली  ?

उत्तर – हे लोक प्रतिनिधी ही घटना घडून गेल्यानंतर काही दिवसांनी म्हणजे दबाव वाढू लागल्यानंतर भेटायला आले पण नंतर त्या॑नी काहीच मदत केली नाही.

प्रश्न – कोर्टात केस लढण्यासाठी शासनतर्फे जे सरकारी वकील देण्यात आले त्यांची आजपर्यंतची भूमिका कशी होती आणि आहे?

उत्तर रेखा आगे – सरकारी वकिलांनी काहीच मदत केली नाही.साक्षी पुराव्यांचा पेपर त्यांनी धडाधड वाचून दाखवला व सही घेतली पण तो काही समजलाच नाही.

राजू आगे – मी मंगळवारी त्यांना भेटलो होतो पण त्यांनी निकालाचि तारीख निश्चित नाही असे सांगितले.आणि गुरुवारी निकाल लागला….आज निकाल आहे हे सुद्धा त्यांनी मला कळवले नाही.

प्रश्न – या प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याचे कारण काय असावे असे तुम्हाला वाटते ?

उत्तर– या प्रकरणात शिक्षका पासून कर्मचारी वर्गाने आपली साक्ष फिरवली. मी ज्या खडी मशीन वर गेली सतरा वर्ष काम करत होतो त्या खडी मशीनच्या मालकाने देखील साक्ष बदलली. त्याने मी त्याच्य़ाकडे सतरा वर्ष काम केले आहे याचा साधा विचारसुद्धा केला नाही.

प्रश्न – साक्षीदारांनी साक्ष फिरवण्याचे कारण काय असेल ?

उत्तर – आरोपींनी पैसे देऊन साक्ष फिरवली असावी असे वाटते. कारण या केस च्या काळात अनेकांनी घरे बांधून घेतली.काहींनी गाड्या घेतल्या. काही साक्षीदार माझ्याकडे देखील पैशाची मागणी करत होते पण मी दिले नाहीत आणि आता निकाल त्यांच्याच बाजूने लागला

प्रश्न – आरोपींच्या कुटुंबाद्वारे तुमच्यावर काउंटर केस घालण्यात आली का ?

उत्तर – हो नितीन च्या आई वर. ही बाई आम्हाला मारहाण करायला धावते अशी केस आरोपी च्या कुटूंबाने टाकली होती.

प्रश्न – तुम्ही नुकतेच मुख्यमंत्री व खासदार अमर साबळे यांची भेट घेतली तेव्हा त्यांची या प्रसंगी काय भूमिका होती ?

उत्तर – मुख्यमंत्र्यांनी साक्ष फिरवलेल्या साक्षीदारांवर कारवाईचे आश्वासन दिले आहे व सरकार उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे सांगितले आहे. खासदार साबळे यांनी नितीनच्या बहिणीला नोकरीला लावण्याचे व आमच्या कुटुंबासाठी पेन्शन सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.

प्रश्न – आपल्या कुटुंबाला अनेक जणांनी भेटी दिल्या त्यात आपल्या जिल्ह्यातील  “थोर” समाजसेवक अण्णा हजारे  होते का?

उत्तर – नाही.

प्रश्न – या घटनेनंतर आंबेडकरी जनतेने कितपत मदत केली  आणि  यापुढे  तुमची आंबेडकरी जनतेकडून काय अपेक्षा आहेत? याबद्दल सांगू शकाल का?

उत्तर – या घटने नंतर अनेक आंबेडकरवादी नेते व लोक भेटून गेले. त्यांनी आर्थिक मदत केली शिवाय कायदेशीर मदत देखील केली. गेली साडे तीन वर्ष मी नितीन ला न्याय मिळावा म्हणून फिरत आसतो. रोज लोक भेटायला येत असतात. परगावी जावे लागते. यामुळे कामावर जाणं होत नाही. कुटुंबाचा सगळा खर्च समाजाच्या मदतीने चालतोय. यामुळे आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. शिवाय कायदेशीर मदत देखील मिळावी अन्यथा नितीनला न्याय मिळणार नाही. नितीन आता फक्त माझा राहिला नाही तर समाजाचा झाला आहे.

प्रश्न -आपल्या यापुढील सरकारकडे  मागण्या काय आहेत ?

उत्तर – राजू आगे – कोपर्डि च्या आरोपीला जशी फाशीची शिक्षा झाली तशीच शिक्षा नितीन च्या मारेकऱ्यांना देखील व्हायला हवी. गुन्हेगारांना जात नसते. एखादा गुन्हा महारा मांगनि केला म्हणजे त्यांना फाशी व वरच्या जातीच्या लोकांनी केला म्हणजे त्यांची निर्दोष मुक्तता हे योग्य नाही. आमचं एकच कुटुंब पत्र्याच्या झोपडीत गावाबाहेर रहात आहे…आरोपी कडून आमच्या जीविताला हानी पोहचू शकते यामुळे शासनाने आम्हांला शस्त्र बाळगण्याचा परवाना द्यावा. जर नितीन ला न्याय मिळाला नाही तर आम्ही जाहीरपणे आत्मदहन करू…

रेखा आगे -मला कोणाचा पैसा नको काय बी नको. मी माझ्या पोरांना मजुरी करून जगविल…फक्त माझ्या पोराला – नितीन ला न्याय मिळवून द्या. कोपर्डिच्या आरोपींना जशी फाशी झाली आहे तशीच शिक्षा माझ्या नितीनच्या मारेकरींना व्हायला हवी.

राजू आगे – नितीन समाजाचा आहे. नितीन सारखी हत्या समाजातील इतर कोणत्या मुला मुलीची होऊ नये यासाठी आम्ही नितीनला न्याय मिळेपर्यंत लढत रहाणार.

समाप्त..

दलित ऍट्रॉसिटी च्या अशा हजारो घटना घडत असतात. परंतु अशी एखादीच  घटना समोर येत असते. नितीन च्या आई वडिलांना कित्येकवेळा थर्ड पार्टी द्वारा केस सेट्ल करण्याची ऑफर देण्यात आली पण ते मागे हटलेले नाहीत.पैशाचा मोह त्यांना खुणावत नाही… त्यांना न्याय हवाय… येथील जातीयवादी ब्राह्मणी व्यवस्थेला त्यांना जाब विचारायचा आहे.

किती भयानक असेल ते स्वतःच मूल गमावण्याचं  दुःख…पण भेटायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते मन घट्ट करून संपूर्ण प्रसंग ऐकवतात..ते ऐकताना आपलेही डोळे ओलावून जातात…

नितीन ला गमवण्यामागे जशी सामाजिक कारणे आहेत तशी आर्थिक आहेत राजकीय आहेत आणि न्यायिक सूद्धा… नितीनच्या पालकांना सलाम करताना आपण पुन्हा एखादा नितीन कसा गमावणार नाही यासाठी काय व्यूहरचना आखायला हवी यावर चिंतन करूया आणि कामाला लागुया.

~~~

 

शब्दांकन – भाग्येशा कुरणे.

खर्डा – भेट विद्यार्थ्यांची नावे – सुरज वाघमारे, गीता वाघमारे, सुयश नेत्रगाँव, शिल्पकार नर्वडे, सुनील ध्रूतराज, तेजस गंगावने, भाग्येशा कुरणे, शिवाजी वाघमारे, जय लोखंडे, मुकेश राजपूत, राहुल ध्रूतराजसिद्धार्थ लान्डगे.

Leave a Reply

Your email address will not be published.