Round Table India
You Are Reading
डॉ. बाबासाहेबांचा 22 वर्षांचा सहवास लाभलेल्या वास्तू, जेव्हा वाट पाहतात आपल्या भेटीची…
0
Features

डॉ. बाबासाहेबांचा 22 वर्षांचा सहवास लाभलेल्या वास्तू, जेव्हा वाट पाहतात आपल्या भेटीची…

Mayuri Adhav

 

मयूरी अशोक आढाव-कारंडे (Mayuri Ashok Adhav-Karande)

Mayuri Adhav

थोडीफार पूस्तके वाचून बाबासाहेब आणि माता रमाई यांचं सुंदर असं नातं, त्याला चार मुलांच्या अकाली मृत्युची, मातृत्व आणि पितृत्व यांच्या संयुक्तीक आहुतीची, धगधगती किनार असलेलं असं नातं मी रेखाटलं होत. शिंदेंनी, कर्डकांनी आणि संभाजी भगतांनी गायलेल्या अनेक गीतांमधून या माझ्या अलौकिक मायबापाचं किंचितसं विश्व मी माझ्या मनात उभं केलं होत. हा संसार मूर्त रूपात ज्या ठिकाणी थाटला त्या बी. आय. टी चाळमधील दोन खोल्या आजही या अलौकिक त्यागाची साक्ष देत आहेत.

आज वयाची तिशी पार करत असताना ज्या मायबापांनी माझ्या हातात लेखणी दिली, अंगावर घालायला कपडे दिले, स्टेजवर उभं राहून गायची, स्वतःचं मत मांडायची संधी दिली त्या मायबापांनी 22 वर्ष ज्या घरात वास्तव्य केलं त्या निवास स्थानाचं मी आज दर्शन घेतलं.बी. आय. टी चाळ क्रं. १ , खोली क्रमांक ५० व ५१ या महामानवाच्या व माता रमाईच्या जीवनप्रवासातील २२ वर्षाच्या कालखंडाची (सन १९१२ ते सन १९३४ ) साक्ष देणारी इमारत मी आज डोळे भरून पाहिली.शाहू महाराज बाबासाहेबांना भेटायला आल्यानंतर जिथे थांबले, जिथून चालत गेले, हे सर्व या डोळ्यांनी पाहणं म्हणजे या जन्माचं सार्थक होण्यासारखच आहे, माझ्यासाठी तरी… एका खोलीत खैरे कुटुंब राहते आणि दुसऱ्या खोलीत तडीलकर कुटुंब, एक बाबासाहेबांचे स्नेही आणि एक बाबासाहेबांचे नातेवाईक. या कुटुंबीयांना पाहताना असे वाटत होते की बाबासाहेबांच आणि माझ्या

रमाईच सान्निध्य लाभलेल्या त्या वास्तु अतुरतेने भेटताहेत. डोळे भरून त्या माझ्याकडे पहाताहेत.

माझ्या या चोवीस वर्षाच्या शैक्षणिक प्रवासात बाबांना समजून आणि बाबांची चोवीस वर्षे ओळख पटवून घेऊन सुद्धा इतके दिवस मी पोरकी होते.माझ्या मायबापापासुन अनभिज्ञ होते. आज या दोन्ही वास्तु मध्ये आपल्याला घडविणाऱ्या,माणसात आणणाऱ्या मायबापांच्या आठवणी आपल्या सर्वांची व्याकुळतेने वाट पाहत आहेत. बाबांच्या लेकींची आणि लेकांची वाट पाहत आहेत. या दोन्ही खोलीपैकी एका खोलीच रूप तिथे राहणाऱ्या ताडीलकर कुटुंबियांनी थोडसं कालानुरूप बदलले आहे. पण बाबांचा सहवास लाभलेल्या, या सध्याच्या कुटुंबियांच्या पूर्वजांच्या आठवणी, सांगणारं ताडीलकर कुटुंब अगदी भारावून जाते. जरी कालानुरूप या खोलीचा चेहरामोहरा बदलला असला तरी आपल्या मायबापांच्या आठवणी आपल्याला भारावून टाकतात. दुसऱ्या खोलीत जिथे खैरे कुटुंब राहते तिथे मात्र खोलीच्या कणाकणावर बाबासाहेबांच्या सान्निध्याच्या छटा आहेत. प्रत्येक कण बाबासाहेब आणि रमाईने स्पर्शिलेला आहे. बाबासाहेबांच्या आणि रमाईच्या चरणस्पर्शाने धन्य झालेल्या भूमीवर आपल मस्तक ठेवून मला माणूस बनविणाऱ्या,माणसासारख वागायला, जगायला शिकवणाऱ्या खऱ्या मायबापांच्या चरणावर नतमस्तक झाल्याचं आणि वंदन केल्याच समाधान मिळालं.त्या दरवाजाला स्पर्श केला जिथे माझ्या मायबापांच्या प्रेमळ स्पर्शाची जाणीव होत होती.

खूप भावनाविवश वाटतय ना सारं,पण खरंच या दोन खोल्या आपल्या बाबांच्या आणि रमाईच्या 22 वर्षांच्या सहवासाचा मौल्यवान ठेवा आहे. ज्या मायबापांनी पोटच्या पोरांचा विचार न करता करोडो राजरत्न घडविण्याचं स्वप्न पाहिलं त्या मायबापांच्या सहवासात एकदा जाऊन या, फक्त त्यागाची आणि संघर्षाचीच प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज समस्यांनी भरलेल्या या जीवनात, जीवन जगण्याची कला असणारा धम्म देणाऱ्या मायबापांच्या सहवासाने पावन झालेल्या या ऐतिहासिक दोन खोल्यांना डोळे भरून एकदापाहून या, नक्कीच दिशाहीन अशा भरकटलेल्या जहाजाला दैदीप्यमान असा ध्रुव तारा दिसेल. मला उभारी मिळाली आहे. तुम्हा सर्व सुज्ञांना खूप काही मिळेल. नक्की आपल्या रमाईच्या आठवणीत रमून या. खूप चीज होईल आयुष्याचं. मी लेखिका नाही एक गृहिणी आणि बाबांच्याच प्रेरणेमुळे शिक्षणाच्या प्रवाहात आलेली एक विद्यार्थिनी आहे. या ऐतिहासिक स्थळाला भेटल्यापासून भावनांच खूप काहूर माजलेले आहे या लिखाणाच्या माध्यमातून भावनांना वाट मोकळी करून देत आहे पण शब्द कमी पडत आहेत…

~~~

Mayuri Ashok Adhav-Karande has done MSW, she is now enrolled for a Mphil-PhD program at Tata Institute of Social Sciences. Her research involves understanding the perpectives of Buddhist women about Ambedkarite Buddha-Dhamma.