Round Table India
You Are Reading
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेला बौद्ध धम्म हाच भारत देशाच्या उद्धाराचा एकमेव मार्ग
0
Features

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेला बौद्ध धम्म हाच भारत देशाच्या उद्धाराचा एकमेव मार्ग

sujit nikalje

 

सुजित निकाळजे (Sujit Nikalje)

sujit nikaljeडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७वी जयंती सर्व पक्ष, संघटना, कार्यालये, देशामध्ये आणि इतरही ठिकाणी साजरी झाली आणि त्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची उजळणी लोकांनी ऐकण्याच्या व भाषणाच्या माध्यमातून केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जय भीम हा नारा सध्या सर्वच राजकीय पक्षामध्ये आणि विविध विचारधारेच्या संघटनांमध्ये मोठया जोमाने आणि ताकतीने घेतला जातो आणि अस्पृश्यांचा नेता म्हंणून असणारी प्रतिमा आत्ता राष्ट्रीय नेता म्हणून सर्वानीच स्वीकारली आहे. सोयीपुरता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार स्वीकारणारे आणि त्यावर आपले मत लादणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. अश्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयाही म्हणणारे लोक त्यांच्या धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्विकार करणार का? हा प्रश्न सतत भेडसावत असतो. अशावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेले भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न डोळ्यासमोर येते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी भारतामध्ये तिसऱ्यांदा धम्मचक्र प्रवर्तन करून सामाजिक क्रांती घडवून आणली. आपल्या आयुष्याचा संपूर्ण काळ अस्पृश्य आणि मागासलेल्या लोकांच्या उद्धारासाठी व हिंदू धर्मामधील जुन्या अनिष्ट रूढी, परंपरा बदलून हिंदू धर्मामध्ये सुधारणा व्हावी म्हणून वेगवेगळ्या चळवळीतून घालविल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आले व त्यांनी सांगितले कि, हिंदू धर्मामध्ये राहून कोणाचाही उद्धार होणार नाही, मुळात तो धर्मच नष्टमय धर्म आहे, हिंदू धर्माची विचारधारा विषमतेवर आधारित असल्याने त्या धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्ती, कुटुंब व समाज हा देखील स्वतःच्या स्वार्थ व धर्माच्या उद्धार पलीकडे कशालाही मोठे स्थान देत नाही. गरीब, पिढीत, मागासलेल्या लोकांना धर्माची आवश्यकता आहे, हे लोक जगतात ते आशेवर, त्याच्या जीवनाचे मूळ आशेमध्ये आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विश्वास होता कि, मानवाचा उत्कर्ष हा बौद्ध धर्मातच आहे आणि एक दिवस उच्च-निच व जाती-भेदामध्ये जीवन जगणाऱ्या भारतामधील विस्कळीत लोकांना स्वातंत्र्याची, समानतेची गोडी लागेल आणि पुन्हा एकदा भारत बौद्धमय होईल. या धम्माचे मुलतत्व ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय लोकानुकंपाय, धम्म आदी कल्याणम, मध्य कल्याणम पर्यावसान कल्याणम!’ असे असल्याने त्यामध्ये सर्वांचे मंगल कामनेचा भाव मुळाशी आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या जागतिक विद्वानाने व्यक्ती मधील, कुटुंबामधील आणि समाजामधील विषमता, द्वेष, असमानता व जातीभेद नष्ट करण्याचा बौद्ध धम्म हा सोपा व सरळ मार्ग दिला. परंतु हा धर्म डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्यामुळे भारतामधील स्पृश्य हिंदूंनी स्विकारला नाही. याउलट या देशामधील स्वार्थी, श्रेष्ठत्वाला आणि संपत्तीला हपापलेले लोक मोठया प्रमाणामध्ये सत्ता व संपत्तीचा वापर करून या देशामध्ये असमानता, अस्थिरता व जातीभेद कायम ठेवण्याचा अतोनात प्रयत्न करीत आहेत. या देशामध्ये असमानता, जातिप्रथा, पुरुष प्रधानता यामुळे अस्वस्थ, अस्थिर, अविकसित, अज्ञानाच्या व अन्यायाच्या गर्तेमध्ये अडकलेला समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमधील बौद्ध धम्माकडे स्वतःच्या मुक्तीचा मार्ग म्हणून बघत आहे. अशावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांना दिलेल्या संदेशाचीे अंमलबजावणी महत्वाची असून ते आपल्या अनुयायांना सांगतात, “आत्ता तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे, तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मान-सन्मान वाटेल अशी कृत्य/ आचरण तुम्ही केले पाहिजे, हा धर्म म्हणजे गळ्यात एक मढे अडकवून घेत आहोत असे समजू नये, बौद्ध धमाच्या दृष्ठीने भारतभूमी सध्या शून्यवत आहे, म्हणूनच आपण उत्तम रीतीने धम्म पालनाचा निर्धार केला पाहिजे.” या पुढे जाऊन त्यांनी संदेश दिला कि, “माणसाकरिता धर्म असतो धर्माकरिता माणूस नव्हे. माणुसकी, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, संघटन, सामर्थ्य, सुखाचा संसार आणि उन्नत जीवन यासाठी बौद्ध धम्मानुसार आचरण करा” हा संदेश संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी दिलेला असून आत्ता डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि बुद्ध पूर्णिमा साजरी करणाऱ्या अनुयायांनी हा संदेश चिकित्सकपणे विचार करून त्यावर आचरण करावे. परंतु जय-भीम म्हणणाऱ्या युवक, संस्था, संघटना याकडून या विचारांच्याकडे दुर्लक्ष होताना दिसते आहे. शेवटी या भारत भूमीचा विकास या देशामधील युवकांवर आधारित मनाला तर भारत भूमीवर जन्माला आलेल्या सुपुत्राने स्वतंत्रपणे भगवान बुद्धाच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अध्ययन करून त्यांनी दिलेल्या व दाखवलेल्या प्रगतीच्या मार्गाचा अवलंब करून त्याच्या सामाजिक क्रांतीचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, देशाच्या हितासाठी व वयक्तिक प्रगतीसाठी बौद्ध धम्माचे आचरण करणे गरजेचे असून त्यासाठी प्राणाच्या मोलाने झटले पाहिजे.

~~~

 

सुजित शांताबाई आनंदराव निकाळजे, बी. ए., एल. एल. बी., एम. एस. डब्लू. (दलित आणि आदिवासी समाजशास्त्र), टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई.

“शिक्षणाचा फायदा आर्थिक स्थर उंचावण्याबरोबर मानवतावाद आचरण करून पसरवण्यासाठी व्हावा.” या उद्देशाने व्यावसायिक शिक्षण घेऊनही केवळ समाजाचे प्रश्न वैज्ञानिकदृष्ट्या समजावून घ्यावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन आणि आंबेडकरी चळवळीमध्ये आयुष्य घालवलेले नवे आणि जुने सर्व पॅन्थर यांच्या संघर्षाला डोळ्यासमोर ठेऊन उच्च शिक्षणाची एक एक पायरी चढत प्रथम बी. ए. त्यानंतर एल. एल. बी. त्यानंतर एक वर्ष वकिली करून पुन्हा एम. एस. डब्लू. त्यामध्येही विशेषतः दलित आणि आदिवासी समाजशास्त्र -भारतामध्ये एकमेव ठिकाणी असणारा कोर्स टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई याठिकाणी पूर्ण केला आहे. सध्या एम. फिल. व पी. एच.डी. चे शिक्षण घेत आहे. एक विद्यार्थी.

 

Leave a Reply

Your email address will not be published.