Round Table India
You Are Reading
वेद–पुराणे, जातीव्यवस्था आणि बहुजन
0
Features

वेद–पुराणे, जातीव्यवस्था आणि बहुजन

tejas 2 harad

 

तेजस हरड (Tejas Harad)

tejas 2 haradमाझा जन्म एका बहुजन कुटुंबातला. माझ्या बाबांना रामायण–महाभारतातील गोष्टी फार खोलात माहिती नसायच्या पण टीव्हीवर पाहिलेलं, इकडेतिकडे ऐकलेलं वगैरे ते मला झोपण्यापूर्वी सांगायचे. शाळेत असताना मी नवनीत प्रकाशनाच्या ‘छान छान गोष्टी’ नावाच्या पुस्तकात पुराण्यातल्या काही गोष्टी वाचल्या होत्या. त्यातील भक्त प्रल्हाद आणि त्याचं सतत ‘नारायण नारायण’ असं जप करणं अजूनही आठवतं. वेद–उपनिषद वगैरे कशाशी खातात ह्याचा अगदी कॉलेजपर्यंत अजिबात पत्ता नव्हता. संत ज्ञानेश्वरांनी गीतेवर भाष्य करणारा ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ लिहिला होता हे पाठ्यपुस्तकात वाचलं होतं तर बाळ गंगाधर टिळकांनी तुरुंगात असताना ‘गीतारहस्य’ हे गीतेवर भाष्य करणारं पुस्तक लिहीलं होतं असं स्कॉलरशीपच्या परिक्षेसाठी तोंडपाठ केलं होतं तेवढंच.

आमच्या गावातील वारकरी गणपती मंदिरात ‘सप्ताह’ भरवायचे ज्यामध्ये संध्याकाळी हरिपाठ, किर्तन व सकाळी ज्ञानेश्वरीचं पारायण व्हायचं. इच्छुक व्यक्ती मंदिराच्या हॉलमध्ये बसून ज्ञानेश्वरीचे एकत्र बसून वाचन करायचे. एकदोन वर्षे मीही ह्या सामूहिक वाचनामध्ये सहभागी झालो होतो. एकतर ज्ञानेश्वरीची भाषा तेराव्या शतकातील, त्यात आम्हाला चार–पाच दिवसांत अठरा अध्याय संपवायचे असायचे. त्यामुळे, आम्ही हा ग्रंथ इतक्या वेगाने वाचायचो की वाचता-वाचता आमची पुर्ण दमछाक व्हायची. ज्ञानेश्वरीतलं काही कळण्याचा प्रश्नच नव्हता. तशी कोणाला उत्सुकताही नव्हती. थोडीफार पुण्याची कमाई आणि शेवटच्या दिवशी मिळणारा पेन हेच आमचं मुख्य लक्ष्य असायचं.

माझी जात कुणबी आहे हे मला पक्कं ठाऊक होतं. कारण गावातील माणसांशी संबंध जातीनुसार ठरतात, जातीचा उल्लेख या ना त्या कारणांनी सतत होत असतो. पण मी हिंदू आहे ही ओळख केवळ शाळा सोडण्याच्या दाखल्यामूळे कळली. हे हिंदू असणं म्हणजे नक्की काय हे आपण मुसलमान नाही आहोत ह्याच्या पलिकडे स्पष्ट नव्हतं. लोक हिंदू धर्माला सनातन धर्म असंही म्हणतात. हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्म आहे असं गर्वाने म्हटलं जातं. वेद, उपनिषदे, पुराणे, रामायण, महाभारत हे हिंदू धर्माचे प्रमुख ग्रंथ मानले जातात. काही लोक भगवद्गीता म्हणजे हिंदू धर्माचं बायबल किंवा कुराण आहे असा दावा करतात.

जे ग्रंथ हिंदू धर्माचा गाभा समजले जातात ते सगळे संस्कृतमध्ये आहेत. संस्कृत भाषा एका छोटेखानी वर्गाची भाषा होती. असं म्हणतात की ब्राम्हण पुरुष सोडून बाकी कोणाला ही भाषा बोलण्याची परवानगी नव्हती — अगदी ब्राम्हण स्त्रियांनासुद्धा. आता ही भाषा मृत समजली जाते कारण ही भाषा कोणत्याही मनुष्यसमूहाची व्यवहाराची भाषा नाही (http://www.thehindu.com/news/national/where-are-the-sanskrit-speakers/article6299433.ece ). वसाहतवादाच्या काळात संस्कृत ग्रंथांचं इंग्रजीमध्ये भाषांतर करण्याचं काम जोमाने झालं. अभ्यासकांनी एकेका ग्रंथाची जेवढी सगळी हस्तलिखिते उपलब्ध होती त्या सगळ्यांना एकमेकांशी पडताळून ठोस अशा प्रमाण आवृत्या छापल्या. मी अजून तपासून पाहिलेलं नाही पण सगळ्या महत्वाच्या संस्कृत ग्रंथांचं इंग्रजीबरोबरच भारतातल्या वेगवेगळ्या भाषांत भाषांतर झालेलं असावं. हे सगळे ग्रंथ भारतीय व विदेशी अभ्यासकांकडून खूप चर्चिले जातात, त्यांच्यावर खूप संशोधन होतं, खूप टिकाटिप्पणी होते.

पण हे ग्रंथ धार्मिक आहेत का? जे स्थान कुराण व बायबलला अनुक्रमे इस्लाम व ख्रिस्ती धर्मात आहे ते स्थान गीतेला हिंदू धर्मात आहे का? आणि हे ग्रंथ बहुजनांच्या आयुष्याशी किती निगडित आहेत? किती बहुजन चारही वेदांची नावे अचूकपणे सांगू शकतील? किती बहुजन एकातरी उपनिषदाचं नाव सांगू शकतील? अठरा महापुराणांपैकी किती पुराणांची नावे आपल्याला माहिती आहेत? आपल्याला नावेपण माहिती नाहीत, त्यांमध्ये काय लिहिलंय हे माहिती असणे खूप नंतरची गोष्ट. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर घरामध्ये शिक्षण घेणारी आम्हा भावंडांची पहिली पिढी. त्यात आमचं गाव अगदी छोटेखानी. घरात पुस्तकं असण्याचा किंवा गावात ग्रंथालय असण्याचा प्रश्नच नव्हता. वेद–पुराणे कुठून वाचणार?

मी म्हणत नाही की रामायण, महाभारत, पुराणे हे आपल्या संस्कृतीचा भागच नाहीत. पण संस्कृतीचा भाग असणं वेगळं आणि ते धर्माचे मुलभूत ग्रंथ असणं, त्यांनी समाजव्यवस्थेची रचना ठरवणं वेगळं. मला मनुस्मृती हा खूप महत्वाचा ग्रंथ आहे आणि आपण त्याचा कट्टर निषेध केला पाहिजे हे जातीअंताच्या चळवळीशी संबंध आल्यावरच समजलं. नाहीतर मनुस्मृती काय आहे, कोणी लिहीली, कधी लिहीली वगैरे गोष्टींपासून मी कोसो दूर होतो. कोणी म्हणेल की एखाद्या ग्रंथाचं स्थान तो ग्रंथ किती लोक जाणतात त्यावरून ठरण्याची आवश्यकता नाही. त्या ग्रंथाचा प्रभाव आपल्या नकळत पूर्ण समाजव्यवस्थेवर पडणं शक्य आहे. वेद, मनुस्मृती वगैरे ग्रंथांबद्दल हेच मत पुढे केले जाते. पण हे कितपत खरं आहे हे शास्त्रशुद्ध पद्धतीने अजून कोणीही सिद्ध केलेले नाही. मनुस्मृती कोणी लिहीली, एका माणसाने लिहीली की अनेकांनी, कोणत्या शतकात, कोणत्या राज्यक्षेत्राचा तो कधी कायदा होता की नव्हता वगैरे सगळे प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहेत. डोनाल्ड आर डेव्हिस, जुनिअर त्यांच्या ‘द स्पिरिट ऑफ हिंदू लॉ’ नावाच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात कि कुठल्याही शासक किंवा शासनसंस्थेने धर्मशास्त्रांचा सक्रिय प्रसार किंवा अंमलबजावणी केल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. त्यांचं इंग्रजीमध्ये असलेलं अवतरण इथे पूर्ण देणे प्रस्तुत होईल. “Grammatically, the rules [in the Dharmaśāstra texts] are usually stated in the imperative or command form known as the optative, though even many declarative statements are interpreted as commands. Due to this form and style, Dharmaśāstra texts give the appearance of being codifications set forth by lawgivers. However, the “lawgivers” here are all mythological figures and there is no historical evidence for either an active propagation or implementation of Dharmaśāstra by a ruler or a state – as distinct from other forms of recognizing, respecting, and using the texts. Thinking of Dharmaśāstra as a legal code and of its authors as lawgivers is thus a serious misunderstanding of its history.”

पुराणातल्या देवांपेक्षा निनावी कुलदैवत किंवा शेतावरचे देव, तळ्याकाठचे देव, डोंगरावरचे देव बहुजनांसाठी जास्त महत्वाचे असतात. पण जसजसा शहरांशी, लिहीत संस्कृतीशी संबंध वाढायला लागलाय तसतसं हे बदलतंय. हिंदुत्ववादी संघटना अगदी प्राणपणाने ब्राम्हणी पाया असलेला ‘प्रमाण’ हिंदू धर्म रेटण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्याप्रमाणे अभ्यासकांनी प्रत्येक ग्रंथाच्या वेगवेगळ्या आवृत्त्या तपासून प्रमाण आवृत्या बनवल्या तिच प्रक्रिया हिंदू धर्माबद्दलही सुरु आहे. कारण बहुजनांचे स्वतःचे देव बाजूला ठेवून एकाच रामाला पुजायला लावलं तर अयोध्येसारखा मुद्दा पुढे करुन त्यांची मुसलमानांविरुद्ध एकजूट करणं सोपं होतं. म्हणूनच ए के रामानुजन ह्यांच्या “Three Hundred Ramayanas: Five Examples and Three Thoughts on Translation” (https://publishing.cdlib.org/ucpressebooks/view?docId=ft3j49n8h7&chunk.id=d0e1254 ) शीर्षक असलेल्या निबंधाला २०११ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून काढून टाकायला लावलं होतं (http://www.bbc.com/news/world-south-asia-15347430 ). जसं इतर धर्मांमध्ये एक देव, एक धर्मग्रंथ, एकाच प्रकारची पुजा असं असतं तश्या प्रकारचं प्रमाणीकरण करण्याचे प्रयत्न जोरदार सुरू आहेत जेणेकरून हिंदू धर्म हा खरोखरच एक साचेबद्ध धर्म आहे हे सगळ्यांच्या गळी उतरवता येईल. जेव्हा आपण जातीअंताच्या चळवळीतील लोक जातीव्यवस्थेच्या आर्थिक–सामाजिक पायापेक्षा तिला वेद-पुराणांमध्ये पाया असलेली धार्मिक बाब ठरवतो तेव्हा आपण ह्या प्रयत्नांना अनवधानाने खतपाणीच घालतो. आपण जातीव्यवस्था समजून घेताना बऱ्याचदा पुस्तकी अवलोकनाला जास्त महत्व देण्याची चूक करतो.

कधी कधी असं वाटतं की वेदांमध्ये काय लिहून ठेवलंय, भगवद्गीतेत काय लिहून ठेवलंय, मनुस्मृती काय सांगते वगैरे गोष्टींना ब्राह्मणांपेक्षा बहुजन जास्त गंभीरतेने घेतात. पण ही पुस्तके आणि प्रत्यक्ष समाजजीवन यांचा किती संबंध होता, मूळात संबंध होता की नव्हता हेच कोणाला अजून व्यवस्थित सिद्ध करता आलेले नाही. वर्ण आधी की जात, वर्णांपासून जाती की जातीसमूहांचे वर्ण की दोन्हींची उत्पत्ती अलगअलग वगैरे गुंते सोडवायचे असतील तर आपल्याला पुस्तकांच्या पलिकडे जावे लागेल, पुरातत्वशास्त्र आणि इतर साधनांची मदत घ्यावी लागेल. केवळ वेद–पुराणांवर अवलंबून राहिलो तर आपण अभ्यासाच्या ब्राह्मणी सीमारेषेत अडकून राहू.

~~~

 

Tejas Harad is Copy Editor at Economic and Political Weekly and regularly writes on caste-related issues for various publications.