Round Table India
You Are Reading
आमच्या आठवणीतील रजनी ताई..!
0
Features

आमच्या आठवणीतील रजनी ताई..!

rajni tilak wide

 

रजनी तिलक ३० मार्च २०१८ ला आपल्यातून गेल्या. याचे दुखः वेगवेगळ्या पातळीवर जाणवत आहे. पुण्यामध्ये घेण्यात आलेल्या आदरांजली कार्याक्रमाध्ये कार्यकर्त्यांच्या व अभ्यासकांच्या अनुभवातून रजनी तिलक उलगडल्या. त्यांच्या व्यक्तित्वाबद्दल थोडक्यात लिहावं म्हणून हा छोटासा प्रयत्न..!

rajni tilak wide

दिनांक ७ एप्रिल २०१८ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे रजनी तिलक यांच्या स्मरणार्थ पुणे शहरातील आंबेडकरवादी कार्यकर्ते यांनी मिळून बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी अर्चना बनसोडेने पुढाकार घेऊन विविध सामाजिक स्थरात काम करण्याऱ्या लोकांना बैठकी विषयीची माहिती दिली. बैठकीसाठी अर्चना बरोबरच सुलभा पाटोळे, सुवर्णा मोरे आणि संध्या गवळी यांनी तयारी केली. संध्या गवळी यांनी बैठकीचे पोस्टर बनविले. सुवर्णा मोरे आणि अर्चना बनसोडेनि बैठक सत्राचा प्रचार विविध सोशल मिडिया च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम केले.

बैठकी मध्ये रजनी ताईना आदरांजली देण्यासाठी २० ते २५ विविध क्षेत्राशी निगडित लोक उपस्थित होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्रामधील सर्व शिक्षक सहभागी, काही अशासकीय संस्थेत काम करणाऱ्या महिला, प्राध्यापक, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आणि विद्यार्थिनी या बैठकीत सहभागी झाल्या.

सदर बैठकीचे स्वरूप हे अनौपचारिक ठेवले होते त्यामुळे स्वतः:च्या भावना व रजनीताई सोबत काम करताना आलेले अनुभव मांडण्यासाठी खुला अवकाश तयार करून देण्यात आला होता. बैठकीचे प्रास्ताविक सुलभा पाटोळे यांनी केले. यामध्ये त्यांनी सांगितले की, आपली एक चांगली मैत्रीण आपल्याला सोडून गेली आहे. हे आपल्यासाठी फार मोठे दुखः आहे. तिचे असे अचानक जाने आपल्या सर्वांसाठी एक मोठा धक्काच ठरल आहेे. आज आपण राजनीताईला आदरांजली देण्यासाठी जमलो आहोत. तिच्या विषयी प्रत्येकाने चार शब्दा मध्ये आपल्या भावना व्यक्त करून तिला आदरांजली देवूया. असे म्हणून सर्वाना बोलण्यास आमंत्रित केले.

प्रथमतः डॉ.स्वाती देहाडराय(प्राध्यापक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र) यांनी स्वतःचा अनुभव सांगताना मांडले की, रजनी तिलक यांनी उत्तरेमध्ये जातीचा प्रश्न घेऊन मोठे काम उभारलेले होते. त्यांचे हे काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्रासाठी अभ्यासाच्या दृष्टीने खूप फायद्याचे ठरले. शर्मिला रेगे म्हणत असायच्या कि, प्रत्यक्ष फिल्ड मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचे ज्ञान आणि वर्गात शिकवले जाणारे ज्ञान यामध्ये फारकत होता कामा नये. आम्ही रजनी ताईशी वेगवेगळ्या टप्यावर चर्चा करत होतो. त्याची आम्हाला खूपच मदत झाली. डिसेंबर २०१७ मध्ये केंद्राने घेतलेल्या दलित महिला परिषदेच्या वेळी रजनीताई आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी दलित परिषदेच्या काही सेशन मध्ये intervention केले. त्यावेळी त्यांचा आवाका काय आहे हे सर्वाना कळाले होते.

रजनी तिलक ह्या वेळोवेळी होणाऱ्या वेगवेगळ्या चर्चा सत्रांमध्ये हस्तक्षेप करत असत. आपण वेगवेगळ्या प्रकारची युती कशी करू शकतो? एकजूट कशी करू शकतो? हि महत्वाची मांडणी त्या सतत करत. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्राच्या वतीने आम्ही त्यांच्या स्मुर्तीला अभिवादन करतो.

सुवर्णा मोरे (पीएचडी विद्यार्थिनी,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र, आंबेडकरी कार्यकर्ता) यांनी त्यांचे मत मांडताना सांगितले कि त्यांची रजनीताईशी ओळख मागच्या 2 ते 3 वर्षा पूर्वी झाली. (माणुसकी(पुणे) येथे सर्व देशभरा मधील दलित स्त्रियांची एक सभा घेण्यात आली होती त्यावेळी त्यांच्या सोबत बऱ्याच विषयावर चर्चा झाली. त्या मिटिंग मध्ये आपण फुले आंबेडकर यांच्या विचारावर आधारित सिद्धांकन मांडले पाहिजे या हेतूने आमचा सिद्धांकन गट आम्ही बनविला. त्यावेळी झालेल्या चर्चेमध्ये रजनीताई यांनी फुले आंबेडकर यांच्या सोबत आपण बुद्धाचे तत्वज्ञान घेणे कसे गरजेचे व उपयुक्त आहे हे मांडले. सर्व गटातील लोकांना सामावून कसे घेता येईल असा सूर त्यांच्या बोलण्यातून प्रथम जाणवला. त्यांच्या सोबत चर्चा करून काम करता येऊ शकते असा आशावाद माझ्या मनामध्ये त्यावेळी तयार झाला.

रजनीताई यांचे म्हणणे असायचे कि आम्ही खूप संघर्ष करत इथपर्यंत पोहचलो आहोत, तुम्हाला एक चांगला अवकाश तयार झाला आहे, ह्या अवकाशाचा तुम्ही वापर करायला शिकले पाहिजे. दलित स्त्रीवादी भूमिका घेऊन अनेकजण फुले, आंबडेकर आधारित मांडणी करतात मात्र यामध्ये प्रत्येकाने आपापल्या सीमा आखून घेतल्या होत्या. यामध्ये माझी धडपड होती कि मी बुद्धाचे तत्वज्ञान घेऊन यामध्ये कशी सहभागी होऊ? याची संधी मला या सभेच्या माध्यमातून मिळाली त्यामुळे सर्व स्त्रियांना घेऊन एक मुक्तीदायी राजकारण उभ करण्याचा आशावाद हा नक्कीच रजनी तिलक यांच्या माध्यामातून तयार झाला होता, पण तो आता अर्धवट राहिला. त्यामुळे त्यांचे अर्धवट राहिलेलं काम पुढे नेणे हीच खरी आदरांजली त्यांना राहील.

निर्मला भाकरे यांनी आपले अनुभव मांडताना अधोरेखित केले कि, रजनीची वैचारिक व्यापकता खूप मोठी होती. ती सतत म्हणायची हि घराघरातली भांडण आहेत ती पहिली संपली पाहिजेत. तिच्याशी माझी वैयक्तिक स्तरावर जवळीक होती. Counseling च्या पातळीवर ती खूप चांगली मैत्रीण होती. तीच कार्यकर्त्याला भिडवन हे खूप चित्तवेधक होत. ती नवीन मुलींसाठी आशादायी होती तर जुन्यांसाठी ती त्यांची मरगळ घालवणारी होती. सगळ्यांना ती व्यासपीठ मिळवून द्यायची. तिच्याकडे दलितेतर ज्या ख्रिचन महिला होत्या त्यांच्या बद्दलची स्वीकृती होती. ह्या महिला आंबेडकर या एका नावावर मंचापर्यंत येऊ शकतात. एकुणच How to come together at national level? ती नेहमी यासाठी धडपडत असायची. मला तिची खूप आठवण येत राहील.

ग्रीन तारा (कार्यकर्त्या) यांनी सांगितले कि, २००९ पासून मी रजनी ला ओळखत होते. तिच्याशी खोलवर अशी जवळीक होती. तिचा आमच्याशी/कार्यकर्त्यांशी असणारा व्यवहार हा उच्च पातळीवरचा असायचा. जेंव्हा कधी ती माझ्याकडे रहायला येई तेंव्हा ती घरात सुद्धा काम करू लागायची. Violence against women यावर ती काम करत होती त्यावेळी आमची मैत्री वाढली आणि मग ग्रीन तारा फाऊंडेशनच्या माध्यामातून आम्ही एकत्र आलो. त्यातून एक सामाजिक जाळे निर्माण झाले. आमचे सतत नेटवर्क असायचे. सध्या ती झारखंड मध्ये Violence वर काम करत होती. तिची शारीरिक स्तिथी खालावलेली असताना व सततच आजारपण जडले गेले असताना देखील ती अशा दूरस्थ भागामध्ये काम करायची. महिलांच्या प्रश्नांसंबंधी कामासाठी ती सतत उत्सुक असायची.

संजय कांबळे (प्राध्यापक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र)- यांनी त्यांचे अनुभव मांडताना सांगितले कि, मी स्त्री अभ्यास केंद्रामध्ये आल्यापासून दुसऱ्या दलित स्त्रीवादी महिलेची आदरांजली मिटिंग करत आहे. एक शर्मिला रेगे आणि दुसऱ्या रजनी तिलक. माझी यांची जास्त ओळख नव्हती पण मी त्यांचे साहित्य वाचलेलं आहे त्यातून त्यांच्या कार्याची ओळख झाली. डिसेंबर मध्ये दलित महिलामध्ये त्यांच्या राहण्याची जबाबदारी माझ्या कडे आली असताना प्रथमतः मी त्यांना प्रत्यक्ष ओळखू लागलो. त्यांचे “अपनी जमीन अपना आसमान” पुस्तकामध्ये सफाई कामगार यांच्यावरती अगदी वाखाण्याजोगी चांगले काम होते. अभिमुख नायक या अंकाच्या त्या संपादक होत्या आणि अशा मासिकाचे संपादक असणे खूप अभिमानाची बाब आहे. दलित आणि मिडिया यावर देखील त्यांनी चांगल काम उभ केलेले होते. ज्या व्यक्तीला मी ओळखत नाही त्या व्यक्तीला मी अभ्यासातून ओळखू लागलो. त्यांचे दलित स्त्रीवादी लेखन महाराष्ट्रात जास्त परिचित झाल नाही. शेवटी संजय कांबळे यांनी अधोरेखित केले कि, एक लेखक किंवा समाजशास्त्रज्ञ म्हणून मी जेंव्हा ह्या घटनेकडे बघतो ते मला असे वाटते कि अशा व्यक्तीचे जाने हे कोणा एका व्यक्तीचे नुकसान नसून ते संपूर्ण समाजाचे नुकसान आहे.

रुपाली जाधव(कबीर कला मंच )-रुपाली यांनी आपल्या मांडणी मध्ये सांगितले कि, ज्यावेळी ती दिल्ली मध्ये WSS म्हणून जो ग्रुप आहे त्याच्या मिटींगला गेली असताना प्रथम ती रजनी ताई यांना भेटली. नंतर त्यांच्या प्रत्येक कृती मधून त्या तिला उलगडत गेल्या. रजनी ताईचे तिच्यावरचे असलेले प्रेम तिला स्वतःला जाणवायला लागले. ज्यावेळी रजनी ताईला मी काहीतरी लिहते आहे हे कळल तेंव्हा त्यांच्या प्रेमामध्ये मला आणखीन वाढ झालेली जाणवली. दलित महिलांना विचारपीठ किंवा आपले मत मांडण्यासाठी अवकाश मिळत नाही त्यासाठी आपण काम करत आहोत असे त्या सतत म्हणायच्या. माझ्या समोर त्यांची प्रतिमा येताना नेहमी उर्जेने भरलेली रजनी टिळक अशीच सकरात्मक व्यक्ती म्हणून उभी राहते. आज मी जे काही माझ्या आयुष्यामध्ये वर आले त्यामध्ये रजनी ताईचा मला मोठा आधार होता. माझ्यातील लेखिका आणि कार्यकर्त्या मधील पोकळी आहे ती भरून काढण्याचे काम त्यांनी केलेले आहे. रुपाली यांनी आपल्या मनोगताचा समारोप रजनी ताई यांच्यावर केलेल्या कवितेने केला.

 अब हम किसे आवाज दे ?

आपको इतनी जल्दी जाने की इजाजत नहीं थी।
अभी तो बहुत सारा काम बाकी था।
अभी तो आंदोलन तेज करने की जरूरत थी।
इस पितृसत्ताक मनुवाद के खिलाफ।
अभी तो शोषित पीड़ित आपकी ओर उम्मीद से देख रहे थे।
और आप सब वहींपे छोड़ के चले गए.
आपने मौत से भी क्यों नहीं किया संघर्ष?
और उसको बताया की…
अभी बहुत काम बाकी है,
इस असहिष्णुता से भरी दुनिया में…
जहाँ इन्सान को आज भी
जूझना पड़ रहा है, मूलभूत जरूरतों के लिए।
अब हम किसे आवाज दे ?
जब होगा उत्पीडन महिलाओं का
तब कौन देगा हमें ताकत लडने के लिए।
अब हमें कौन देगा हिम्मत?
कौन करेगा प्रोत्साहित, नवनिर्माण के लिए,
कौन बतायेगा की हम भी किसीसे कम नही?
अब हम कैसे लड़ेंगे उस अंदरूनी लड़ाई के साथ
जो आंदोलन के भीतर भी है जाति और वर्ग से भरी है।
यदि नहीं है इन सभी सवालों के जवाब,
तो आपको कोई हक नहीं था हमें अकेला छोड़ने
रुपाली जाधव
(कबीर कला मंच पुणे,महाराष्ट्र)

 डॉ.अनघा तांबे((प्राध्यापक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र)-यांनी त्यांचे अनुभव मांडताना सांगितले कि, वीस वर्षा पूर्वी जेंव्हा मी स्त्री अभ्यास केंद्रा मध्ये काम करत होतो तेंव्हा दलित चळवळीशी स्त्रीवादी यांना जोडण्याचे काम चालू असताना रजनी तिलक हे नाव समोर आलं. त्यांचे दिल्ली मध्ये तसेच उत्तर भारतात काम आहे .आम्ही जेंव्हा दिल्ली मधील स्त्रीवाद्यांसोबत काम करायला लागलो तेंव्हा तिथला संघर्ष काय आहे, आंबेडकरी दलित स्त्रीवाद्यांच्या चर्चा तसेच दलित स्त्रीवादी आणि मुख्य प्रवाहा मधील स्त्रीवादी यांच्या चर्चा आम्ही ऐकल्या आणि आम्ही त्या समजून घ्यायला लागलो. आज एवढ्या वर्षाचा अभ्यास असून देखील ते समजून घेणे अवघड आहे. शर्मिला च्या नंतर आता आम्ही केंद्र म्हणून पुन्हा नव्याने पुढे नेण्याचा प्रयत्न करत होतो. रजनी तिलक यांच्या माध्यमातून संवाद निर्माण करण्याचे काम उभे राहिले असते मात्र शर्मिलाच्या नंतर त्यांचे जाणे हे संवाद पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून आमच्या दृष्टीने पुन्हा मागे नेणार आहे.

अर्चना बनसोडे(क्रांतीज्योती ) यांनी सांगितले कि, रजनी ताई माझ्यासाठी प्रेरणा आहेत. मी ज्यावेळी दिल्लीला गेले होते तेंव्हा आझाद मैदानावर atrocity चे bannar लागलेले होते, रजनी तिथे होत्या, मला प्रश्न पडला कि रजनी ह्या तर एवढ्या मोठ्या लीडर आहेत त्या एका परिवारासाठी तिथे येऊन लढत आहेत याचे मला आश्चर्य वाटले. तेंव्हा पासून माझा मनात त्यांच्या बद्दल आदर अधिक वाढला. त्यांनी भारत भरामधील दलित स्त्रियांचा व्हास्टप वर “लेखिका मंच बनविला”त्यामध्ये नव-नवीन लेखन समोर यावे या साठीचा त्यांनी केलेला तो प्रयत्न होता,पण आता ते काम अर्धेच राहिले. हा ग्रुप त्यांनी रजिस्ट्रेशन करून बनविलेला होता. अशा व्यक्तीच जाणं हे देशाचं, समाजाचं नुकसान आहे. त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य पुढे नेणे हीच खरी त्यांना आदरांजली राहील.

सुलभा पाटोळे(प्राध्यापक ) यांनी अधोरेखित केले कि,१९९७ मध्ये रुथ मनोरमा ने दक्षिणेमध्ये “Dalit Women Speak Different” हि परिषद घेतली होती. त्यामध्ये आम्ही चर्चा केल्या आणि या परिषदेच्या दरम्यानच रजनीची आणि माझी ओळख झाली. रजनी व माझ्या मध्ये त्यानंतर सतत संवाद होऊ लागले, रजनी मला दिल्लीला बोलण्यासाठी बोलावून घ्यायची त्यामुळे तर आमचा अधिक संवाद वाढत गेला. रजनीने तिच्या मुलीला देखील घडविण्यामध्ये प्रयत्न केले ती मला म्हण्यायची “ये लडकी तो मिडल क्लास बनती जा राही है!” माझ्या मुलीला उत्पीडन क्या है? शोषण क्या है? हे तिला समजल पाहिजे.ग्रास रूटच काम तिला कळाल पाहिजे हा तिचा नेहमी प्रयत्न असायचा आणि त्यामुळे तिने तिच्या मुलीला पुढील शिक्षणासाठी TISS तुळजापूर संस्थेमध्ये सामाजिक संशोधना साठी प्रवेश घेऊन दिला. तिचा वैयक्तिक पातळीवरचा प्रवास खूप व्यापक आहे. तिचे अभिमुख मध्ये काम करणे किंवा इतर काम करणे असेल त्यावरून ती नक्कीच एक चांगली समाजशास्त्रज्ञ होती. जमिनीशी उत्पीडन जाणणारी अशी मुलगी तिने तयार केली. ती जेंव्हा महाराष्ट्रा मध्ये यायची तेंव्हा तिला वैचारिक दृष्ट्या उपजाऊ जमीन म्हणून महाराष्ट्र महत्वाचा वाटायचा. तसेच ती म्हणायची इथे फुले दांपत्य, डॉ.आंबेडकर होऊन गेले त्यामुळे एक नाळ जोडल्या सारखे वाटते इथे आल्यावर. तिने नुकतेच फुले,आंबेडकर,सावित्री पेरियार यांचे समग्र लेखन हिंदी मध्ये भाषांतर करायला सुरुवात केली होती. तस तिने “आम्हीही इतिहास घडविला आहे” याचे हिंदी भाषांतर केलेले आहे. तिच्या ह्या सर्व धडपडीला माझा सलाम असायचा.

उत्तरेमधील लोकांना पुढील वीस वर्षानंतर तिच्या कामाचे महत्व नक्कीच कळेल.एक स्पार्क लावण्याचे काम उत्तरेत रजनी ताई ने केले आहे. आमची नाळ तिने उत्तरेशी जोडून दिली. मी इथून तिच्याशी चर्चा करत असे आम्ही मुजफ्फर नगरच्या दंगली वर बरीच चर्चा देखील केलेली होती. स्त्रीयामधील डिप्रेशन बाहेर काढायचं काम जस शर्मिला इथे करायची आणि तस ती तिथून करायची. आजही चळवळीला जोडू पाहणाऱ्या मुलींना धरून ठेवण्याचं काम रजनीन केले. ह्या तरुण मुली आज एकट्या पडत आहेत,त्यांना आपण धरून ठेवलं पाहिजे अशी तिची भावना असायची.

अहमदाबाद मध्ये तिने ‘मिडिया में दलित महिला का स्थान’ यावर एक कार्यशाळा आयोजित केली होती. त्यामध्ये दलित महिला यांना कसे डावलले जाते यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. त्यामुळे आपला स्वतंत्र मिडिया आपण उभा करणे गरजेचे आहे हे ती मला नेहमी बोलत असे. तिचे सामाजिक नेटवर्क हे उत्तरेपासून धर्मशाळे पर्यंत असायचे. वयाच्या परीघामध्ये ती अडकली नाही.तिचे काम पुढे नेण्यासाठी आपापल्या परीने आपण प्रयत्न करूयात.तिला समृद्ध करूयात तसेच ज्योत्सना तिची मुलगी हे काम करेलच तिलाही आपण साथ देऊया. आपण संघर्षासाठी सज्ज राहुयात आणि तिचं काम हेच आपल्याला पुढच्या कामासाठी उर्जा देणार असणार !

एकंदरीत रजनी तिलक यांचा व्यापक कामाचा आढावा सर्व कार्यकर्ते तसेच प्राध्यापकांनी त्यांच्या अनुभवातून सांगितला. रजनी तिलक यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष करत असताना ज्ञानाच्या सत्ताकारणाला प्रश्न करत दलित महिलांचे स्थान कुठे आहे? त्यांचे प्रश्न हे इतर स्त्रियांपेक्षा कसे वेगळे आहे हे वेळोवेळी विविध माध्यमातून मांडले. तसेच प्रादेशिक भाषेमध्ये साहित्याचे भाषांतर करून ज्ञानाचे सार्वत्रीकरण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसून येतो.विविध लोकांनी त्यांचे अनुभव मांडताना रजनी तिलक यांनी जसे त्यांच्या समकालीन वयाच्या कार्यकर्त्या सोबत काम केलेले तसेच त्यांनी नवीन कार्यकर्त्या सोबत देखील काम केले आणि त्यांना चळवळीशी बांधून ठेवण्याचे सर्वात मोठे योगदान दिले. एकूणच त्यांच्या कामाचा, मैत्रीचा, आढावा घेत त्यांना आदरांजली वाहिली आणि आपण सर्वांनी नवीन उर्जा घेत रजनी ताईच्या अपूर्ण राहिलेल्या कामाला सुरुवात करूया असे सर्व लोकांनी व्यक्त केले. आंबेडकरी स्त्रीवादी आणि विद्यापीठ स्थरावरून चाललेल्या स्त्री आभ्यास केंद्राच्या माध्यमातून ही आदरांजलीची सभा पार पाडण्यात आली. यामध्ये पल्लवी हर्षे आणि दिपाली चव्हाण यांनी हि सभा यशस्वी करण्यामध्ये हातभार लावला.(विशेषतः विद्यापीठ मधील कॅन्टीन बंद असताना देखील यांनी विद्यापीठा च्या बाहेर जाऊन सर्वांसाठी चहा आणला.)

संकलन – सुवर्णा मोरे

~~~

 

Suvarna More is an Ambedkarite Buddhist Scholar and researcher with Pune University.

 

Leave a Reply

Your email address will not be published.