Round Table India
You Are Reading
ब्राम्हणी पितृसत्ता आणि सोशल मीडिया
0
Features

ब्राम्हणी पितृसत्ता आणि सोशल मीडिया

bhagyesha

 

Bhagyesha Kurane

bhagyeshaसोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा सध्या एक अविभाज्य घटक झालेला आहे. सोशल मीडियाचा वापर करावा की करू नये अथवा कशाप्रकारे करावा याबद्दल समाजामध्ये अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जातात. काही व्यक्तींना वाटतं सोशल मीडिया हे टाइमपास करण्याचं एक साधन आहे. उगाच त्यावर वेळ खर्ची करू नये. अनेक मुलींच्या पालकांना असं वाटतं की सोशल मीडियाद्वारा समाजकंटक मुलींना त्रास देऊ शकतात. यामुळे मुलींनीच या माध्यमांपासून दूर राहावं. या गोष्टींचा विचार करता असं लक्षात येत की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण अनेक व्यक्तिंशी एकाचवेळी जोडले जावू शकतो. भलेही आपला त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध असो अगर नसो. आपण आपल्या विचारांची देवाणघेवाण करू शकतो. प्रस्थापित माध्यमांना एक पर्याय उभा करता येईल का हा विचार करत मी देखील सोशल मीडिया जॉईन केलं. फ़ेसबुक, व्हॉट्सअॅप यांसारख्या माध्यमातून लोकांशी संबंध ठेवू लागले. गेली सहा वर्षे मी फ़ेसबुकवर आहे. पर्यायी माध्यम असा सोशल मीडियाचा विचार करत असतानाच ही माध्यमे मुलींच्या बाबतीत कितपत सुरक्षित आहेत याबद्दल मला थोडी विस्ताराने चर्चा करावीशी वाटते. अर्थात नुकत्याच घडलेल्या अमर खाडे प्रकरणाचा यास संबंध आहे.

प्रथम आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपल्या ब्राह्मणी पितृसत्ताक समाजामध्ये मुलींनी मोबाईल कसा वापरावा, कितपत वापरावा याचे काही नियम ठरलेले आहेत. अनेकवेळा काही अडचण येऊ नये म्हणून मुलींना मोबाईल वापरण्यास देण्यात येतो. पण मुलीच्या मोबाईलच्या वापरावर कठोर निर्बंध घातले जातात. कारण आपला स्त्री-जात्याधारीत समाज मुलीला कुटुंबाची ‘इज्जत’ मानतो. त्यामुळे तिचा मोबाईलद्वारा अन्य व्यक्तिंशी संबंध येऊन ती कोणाशी भावनिक दृष्टीने जोडली गेली व जर तिने स्व:मर्जीने विवाह करण्याचा निर्णय घेतला तर कुटुंबाची ‘अब्रू’ जाईल असे पालकांना वाटते. यामुळे मुलीचे हे संपर्काचे साधन मर्यादित राहावे यासाठी पालक प्रयत्न करतात. यातूनच मग मुलींचे मोबाईल तपासले जातात. त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले जातात. या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक मुलींसाठी सोशल मीडियाचा सहजरित्या वापर करणं हीच एक मोठी गोष्ट असते. समाजाचे पारंपरिक निर्बंध झुगारुन ती समाजमाध्यमातून व्यक्त होण्याचा प्रयत्न करते परंतू आपला ब्राह्मणी पितृधारी समाज तिच्याकडे एक व्यक्ती म्हणून न बघता मनोरंजनाचे आयते उपलब्ध झालेले साधन असंच पाहत असतो. यामुळे मुलींना ऑनलाइन जगात अनेकवेळा लैंगिक शोषणास सामोरं जावं लागतं.

मुलींच्या फोटोचा गैरवापर करणे, ह्या फोटोचा वापर अश्लील संदेश पाठवण्यासाठी करणे, मुलींची संमती नसताना तिला नग्न फोटोमध्ये टॅग करून तिची बदनामी करणे, असे प्रकार दररोज सुरू असतात. व्हॉट्सअॅपवरील ग्रूपवर देखील मुलींविषयक निर्भत्सना करणारे विनोद फिरत असतात. परंतु ब्राम्हणी पितृसत्ताक मानसिकतेमध्ये अडकलेल्या समाजाला हे असे प्रकार आक्षेपार्ह वाटत नाहीत. त्यामूळे लाइक आणि शेअर करून असे संदेश लगेचच व्हायरल होतात. एका नवबौद्ध कुटुंबातून आलेली स्त्री या नात्याने मी जेव्हा ह्या सर्व घटकांचा विचार करते तेव्हा असं लक्षात येतं की या समाजमाध्यमात जातीय भेदभाव व पुरुषसत्ता अशा दोन्ही प्रकारच्या अन्यायाला दलित आदिवासी मागासवर्गीय स्त्रियांना सामोरं जावं लागतं. ‘आरक्षणाची अवलाद’ अशा पोस्टना तोंड देत असतानाच ‘लड़कियां ऐसीही होती है’ यांसारख्या तर्कहीन गोष्टींना सामोरं जावं लागतं. नुकतेच जेव्हा लातूरमधील संविधान मोर्चामध्ये एका मुलीचं भाषण झालं तेव्हा त्याला आलेली प्रत्यूत्तरे भयानक होती. “तुम्ही दलित आदिवासी बायका तुमची लायकीच आहे रांडा म्हणून रहाण्याची… माझ्या बापाने एक नाही चार चार रांडा ठेवल्या आहेत,” असं लोक उघडपणे म्हणत होते. या घटनेचा विचार करता दलित आदिवासी स्त्रियांना या व्यवस्थेत अधिक मानहानीला सामोरे जावे लागते असे मला वाटते.

मुळात एक आंबेडकरवादी या नात्याने आम्ही अनेक तरुण मुली सोशल मीडियाचा एक पर्यायी माहीती प्रसार यंत्रणा असा वापर करतो. देशभरात वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिकणारा वर्ग, प्राध्यापक, अधिकारी, लेखक, विचारवंत यांच्या संपर्कामध्ये राहून त्यांचे लेख, नवीन संशोधन यांचा उपयोग करून स्वतःचे ज्ञान कालसुसंगत करणे असा आमचा उद्देश असतो. शिवाय छोट्या-छोट्या गाव भागात शहरात राहणा-या लोकांशी संवाद साधता यावा, त्यांच्यासोबत विचारांची देवाणघेवाण व्हावी हासुद्धा एक उद्देश असतो. याचा मला आजवर मोठ्या प्रमाणात उपयोग झालेला आहे हे मी प्रथमतः मान्य करते. परंतु असा उद्देश ठेवून मार्गक्रमण करत असताना अनेक अपिरिचित व्यक्तिंशी संबंध ठेवावा लागतो. यावेळी अनेक अडचणी येतात. कारण फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली केली की धडधड हाय, हेलो हाय… असे मेसेजेस येणं सुरू होतं. कधीकधी लोक स्त्रीयांच्या लैंगिकतेवरून आक्षेपार्ह विधाने करतात. नुकताच माझ्या एका आंबेडकरवादी मैत्रिणीला स्वतःला आंबेडकरवादी म्हणवून घेणाऱ्या एका मुलाने असाच त्रास दिला. तिने प्रत्यक्ष ओळख नसताना देखील समविचारी वाटल्याने फेसबुकवर त्याच्या मैत्रीचा स्वीकार केला व त्याने मात्र याचा गैरफायदा घेतला. त्याच्या अनेक मित्रांसाठी ही गोष्ट धक्कादायक होती कारण ही व्यक्ति सामाजिक प्रश्नावर तावातावाने गप्पा मारायची. लोकांना उपदेशाचे डोस द्यायची. त्यामुळे जेव्हा हे प्रकरण समोर आले तेव्हा त्याच्या बऱ्याच मित्रांनी त्याचे फेसबुक अकाउंट हॅकतर झाले नसेल ना अशी शंका व्यक्त केली. पण पुढे या व्यक्तीने अनेक मुलींना त्रास दिल्याचे समोर आले. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर मला एक विचारावंसं वाटतं की स्वतःला आंबेडकरवादी म्हणवून घेऊन काही लोक आपल्याच आंबेडकरवादी मैत्रिणींना त्रास देत असतील तर यांचा बंदोबस्त आपण कसा करणार् आहोत? माझ्या अनेक मैत्रिणींनी असं मत व्यक्त केल की यापूर्वीही हा व्यक्ती लिंगभावातीत (gender biased) पोस्ट टाकायचा तेंव्हा मात्र अनेक आंबेडकरवादी तरुण शांत रहायचे… आज अनेक आंबेडकरवादी तरुण ह्या तरुणाच्या कृत्याने व्यथित झालेले आहेत. त्यांनी त्याच वेळी जर कठोर भूमिका घेतली असती तर कदाचित आज ही वेळ आली नसती.

आणखी एक मुद्दा मला इथे उपस्थित करावासा वाटतो, तो म्हणजे विश्वासार्हता. जेव्हा हे प्रकरण पहिल्यांदा उघडकीस आले तेव्हा अनेक लोकांनी हे अकाउंट हॅक झालेले असेल असे मानून त्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा चार पाच मुलींनी त्याच्या विरोधात तक्रार केली तेंव्हादेखील तुम्ही दुर्लक्ष करा, त्याला ब्लॉक करा, हे मुद्दे खूपच लहान आहेत, आपल्याला अजून बरेच मोठे विषय हाताऴायाचे आहेत, असं सांगून आम्हाला शांत करण्याचा प्रयत्न केला. काहींनी तर यास निष्फळ चर्चा मानली. काहींना हे वैयक्तिक भांडण वाटले. याचा आम्ही काय अर्थ घ्यायचा? तुमच्यासारख्या एका दलित आदिवासी कुटुंबामधून आलेल्या स्त्रीयांवर तुमचा विश्वास कमी आहे का? की एखादया स्त्रीची सार्वजनिक जीवनात लैंगिक निर्भत्सना होणे हे प्रकरण तुम्हाला शुल्लक वाटते? ज्या फुले आंबेडकरांनी स्त्रीयांच्या प्रतिष्ठेकरता आयुष्यभर लढा दिला, त्या स्त्रियांची सार्वजनिक जीवनात होणारी अप्रतिष्ठा आपण शुल्लक कशी काय मानू शकता?

शेवटी मला एवढंच म्हणावंसं वाटतं की या घडलेल्या प्रकरणाचा आपण समूऴ विचार करावा. ह्या गोष्टीतून आपण योग्य तो बोध घेतला पाहिजे. मुलींनीदेखील अनोळखी मुलांशी मैत्री करताना सावधगिरी बाळगावी. कारण आपले विचार जरी बदललेले असले तरी समाज मात्र अजूनही त्याच बुरसटलेल्या पारंपारिक मानसिकतेचा आहे व हा समाज सोशल मीडियामध्ये प्रतिबिंबीत होतोय.

समताधारक समाजाच्या उभारणीकरता धडपडत असताना दलित आदिवासी इतर मागासवर्गीय स्त्रीयांना जात आणि स्त्रीदास्य ह्या दोन्ही आघाड्यांवर संघर्ष करावा लागतो. कुटुंब आणि समाज अशा दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी लढत असताना अनेक वेळा त्यांचं मनोबल कमी-जास्त होत असतं. पितृसत्ताक कुटुंबातून संघर्ष करून बाहेर येऊन स्त्रिया आता कुठे विचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपलं मत ठळकपणे मांडत आहेत. तेव्हा आपला व्यवहार त्यांच्याशी सौहार्दतापूर्ण असला पाहिजे. उदाहरणार्थ, त्या जेव्हा रस्त्यावर उतरून आंदोलनातून आपले मागणे मांडण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा “रस्त्यावर उतरून काय फायदा” अशी टीका करण्यापेक्षा हा रस्त्यावर येण्याचा हक्कसुद्धा त्यांनी कुटुंबियांशी आणि समाजाशी भांडून प्राप्त केला आहे याचे आपण भान ठेवायला हवे. त्यांच्या चुका आपण टिंगलटवाळी न करता समाजावून सांगितल्या पाहीजेत नाहीतर कदाचित त्यांचं खच्चीकरण होऊन त्या भविष्यात व्यक्त होणेही टाळू शकतात. तेव्हा एकंदरीत त्यांच्याशी सौहार्दपूर्ण वर्तन असावे. बाबासाहेब म्हणाले होते की “एखादया समाजाची प्रगती मी त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगती वरून मोजतो.” तेव्हा समाजातील स्त्रियांचा लढा हा प्रत्येकाचा लढा आहे व तो आपल्या प्रत्येकाला लढावा लागेल हे आपल्या लक्षात असू द्या.

 ~~~

 

 Bhagyesha Kurane has a B.A. in political science from Fergusson College.