Round Table India
You Are Reading
जागृत समाज आणि संवेदनशील राज्याचं शासन हेच समाज जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून आनु शकते
0
Features

जागृत समाज आणि संवेदनशील राज्याचं शासन हेच समाज जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून आनु शकते

sujit

 

सुजित निकाळजे (Sujit Nikalje)

sujit“शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे तो जो प्राषण करील तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.”- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हि गुरगुर म्हणजे तरी काय या देशात होणाऱ्या अन्याया/अत्याचारा विरुद्ध आवाज उठवणे, स्वताच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवणे, लोकांच्या ज्वलंत प्रश्नांवर बोलणे त्याच्यावर आवाज उठवणे, लोकांच्या स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि सामाजिक न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करणे होय. या सर्वबाबी मिळविण्यासाठी जागृत समाज व तत्पर शासन या दोन्ही गोष्ठी गरजेच्या आहेत. स्वतंत्र भारतामध्ये ६९ व्या वर्ष्यामध्ये लोकांना काय मिळाले? याचा विचार जर केला तर असे दिसते कि, पूर्वीपासून शिक्षण नाकारणाऱ्या समाजाला आजही शिक्षण मिळू नये अशी व्यवस्था करून ठेवली आहे. पूर्वीपासून जंगलात राहणाऱ्या आदिवाशी बांधवाला रोजगार व शिक्षण न देत त्याचे जंगल त्याच्या पासून हिरावून घेतले आहे. ३३% आरक्षणाची घोषणा करून नाव महिलेचा आणि सत्ता स्वताची अशी व्यवस्था करून महिलांना आणखीनच दुबळे केले आहे. मग खरतर आज प्रश्न हा आहे कि, काय खरच त्या तमाम दिन,दलित, पिढीत, शोषित लोकांना मिळाले आहे का स्वातंत्र्य? किंवा खरा स्वातंत्र्याचा उपभोग कोणी व कोणत्या समाज घटकांनी घेतला आहे? आणि अजून किती काळ स्वातंत्र्याचा उपभोग लोकांना अशिक्षित आणि अडाणी ठेऊन घेणार आहेत हे सत्ताधारी ब्राह्मणवादी लोक? किती काळ अलिखित आरक्षणाचा लाभ घेऊन स्वताच देवळामध्ये – पुजारी, शिक्षणसम्राट, कारखानदार, जमीनदार, उद्योगपती, राजकारण आणि उरले सुरले सर्व प्रशासनामध्ये , न्यायव्यवस्थेमध्ये आणि मंत्रीमंडळामध्ये उच्चपदावर बसणार आहेत? आणि या सर्व प्रश्नांकडे दूरदृष्ठीने आणि सत्यतेने हा सध्याचा केवळ पोटाचे पाईक बनलेला समाज कधी जागृत समाज होऊन उघड्या डोळ्यांनी पाहणार आहे कि नाही? वर्षानु वर्ष केवळ आरक्षणावर भांडण करत बसण्यापेक्षा सर्व युवकांना संधी मिळविण्यासाठी त्या सर्वांची सुरवात एकाच समान ठिकाणापासून (One Starting Point) कधी होणार आहे कि नाही, आणि त्याच्यासाठी कोणी प्रयत्न करणार आहे कि नाही? आणि आजच्या समाज व्यवस्थेमध्ये ती अवस्था नाही हे समजून घेणार आहे कि नाही? का केवळ माणसांच्या भावना भडकावून होत असलेल्या अन्यायाकडे तमाश्या बघणाऱ्या लोकांच्या बरोबर उभा राहून हा स्वतंत्र जागृत समाज केवळ नागड्या डोळ्यांनी बघत राहणार आहे का? “अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा दोषी” असे म्हणतात पण मग समोर दुबळ्यावर अन्याय घडत आहे हे माहित असून केवळ काही न करता बघणारा दोषी नाही का याचे चिंतन होणे गरजेचे आहे.

शिक्षण व्यवस्थे मध्ये विद्यार्थ्याचे स्थान
विद्यार्थी कोणाला म्हणायचे? साधारण शाळेमध्ये बसणाऱ्या सर्वांनाच आपण विद्यार्थी म्हणतो, विद्या अर्जन करणारा विद्यार्थी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्या प्रमाणे मी अखंड (पूर्ण आयुष्यभर) विद्यार्थी आहे. महाविद्यालयात खास करून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यावे म्हणून का प्रेरित केले जाते, त्यांना का शासना कडून मानधन दिले जाते? कारण जगामधील प्रत्येक देशाचा विद्यार्थी हा त्या देशाचे भविष्य असतो, मानधन देण्याचे काम फक्त भारत देशामध्ये होते का? नाही, संपूर्ण जगामधील विद्यार्थ्यांना त्यांनी उच्च शिक्षण घ्यावे म्हणून प्रयत्न केला जातात आणि योग्य मानधनही दिले जाते. उच्च शिक्षण, व्यावसाईक शिक्षण किंवा तांत्रिक शिक्षण घेणारे विद्यार्थी खऱ्या अर्थाने देशाला घडवीत असतात. त्यांनी प्रयोग शाळेमध्ये केलेले प्रयोग हे त्याचे देशासाठी दिलेले योगदान असते आणि हे केवळ पुस्तक वाचून होत नाही तर त्याच्यासाठी स्वताची बुद्धी आणि वेळ द्यावा लागतो. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली, हैद्राबाद राष्ट्रीय विद्यापीठ, जाधवपूर राष्ट्रीय विद्यापीठ तसेच देशातील इतर राष्ट्रीय विद्यापीठे आणि मुंबई विद्यापीठ या सारखी अनेक राज्यपातळीवरील विद्यापीठे आणि टाटा सामाजिक विद्यान संस्था, मुंबई या सारखी स्वायत्त विद्यापीठे हि सामाजिक विज्ञानावर अभ्यास करून समाजातील ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष देतात आणि राज्य व केंद्र सरकारला त्यांच्या सामाजिक स्तिथिचा आढावा देतात. त्यांनी केलेल्या अभ्यासातून आणि संसोधानातून सरकार समाज्याच्या ज्वलंत प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात. स्वतंत्र मिळाल्या पासून किंवा त्याच्याही अगोदर पासून या शैक्षणिक संस्थांनी समाजाला मार्गदर्शन करून स्वतंत्र विचारसरणीचे लोक जन्माला घातले त्यातूनच स्वतंत्र सैनिक निर्माण झाले. तेव्हा आज ज्या विद्यार्थ्याची चर्चा होत आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून तो देशाचे भविष्य आहे. परंतु आज याचं देशाचा एक सुंदर कवी रोहित वेमुला याचा विद्यापीठीय खून झाला आणि असे लक्षात आले कि तो त्या विध्यापिठातील तीसापेक्षा अधिक नंबरवर होता ज्यांनी यापूर्वी याच विध्यापिठात आत्महत्या केल्यात. महावीर वैद्यकीय विध्यापिठा, दिल्ली मध्ये काही मुलांना जाणूनबुजून त्याच वर्गामध्ये ठेऊन जातीय द्वेषातून नापास केले जाते तसेच आय. आय. एम., आय. आय. टी. या ठिकाणी नवीन प्रकारच्या जातीय द्वेषभावनेतून होणाऱ्या अन्यायाला सामोरे जावे लागत आहे. कारण भारतामध्ये विद्यार्थ्याची व्याख्या वेगळी आहे, “समान शिक्षणाच्या नावाखाली शासकीय शाळा मधून निकृष्ट दर्ज्याचे अन्न देणे, अभ्यासक्रमामध्ये जाणून बुजून ज्यातून ज्ञानाची निर्मिती होईल असे कोणतेही धडे मिळू नये असा प्रयत्न करणे.” धार्मिक प्रार्थना, धार्मिक सन आणि शिक्षकांची एकाधिकार शाही यातून विद्यार्थी फक्त परीक्षेपुरातच वाचन करतो त्यापुढे त्याचे अजिबात लक्ष त्यामध्ये रमत नाही. आणखी एक महत्वाचे म्हणजे सत्ता करणाऱ्याला नेहमी असे वाटत असते कि, गरीब दलित आदिवाशी या लोकांनी शिक्षण घेऊ नये आणि घेतलाच तर तांत्रिक शिक्षण (दहावी/ बारावी नंतरचा आय. टी. आय. कोर्स) घ्यावे व लवकरच चतुर्थश्रेणी कामामध्ये लागावे. भारतामध्ये उभ्या राहणाऱ्या कंपनी मध्ये चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून फक्त भारतातील लोकांना घेतात म्हणजे केवळ गाढवकाम करणारी माणसे सत्ताधाऱ्याना पाहिजे आहेत. पण वरवर पाहता ती चांगाली गोष्ठी दिसत असली तरी त्यामुळे पुढील सर्व शिक्षण तो विद्यार्थी थांबवतो आणि लवकर नोकरी, लवकर लग्न, लवकर मुले आणि कधीही न थांबणारी पैसे कमावण्याची धावपळ या चक्रात फिरत राहतो.

देशातील अनेक राष्ट्रीय व सामाजिक शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या शैक्षणिक संस्थांमधून समाजाला घडविणारे त्याला दिशादर्शक म्हणून काम करणारे विद्यार्थी घडवले जातात आणि नेहमीच ते समाजातील वाईट कृतीचा आणि राष्ट्राने किंवा राज्याने केलेल्या अन्याय व अत्याचाराच्या विरुद्ध बोलताना व लिहिताना दिसतात. माझ्या मते खरा विद्यार्थी तोच जो होणारा अन्याय अत्याचार उघड्या डोळ्याने पाहिलं आणि त्याच्यावर स्वताचे मत व्यक्त करील. चांगला अभ्यासक विद्यार्थीच कोणत्याही देशाचा सुजाण व जागृत नागरिक बनत असतो. स्वातंत्र्य देशामध्ये शेवटच्या घटका पर्यंत पोहचून त्याच्या प्रश्न उठवणे हेच सुजाण नागरीकाचे कर्तव्य आहे.

शिक्षणामध्ये दलित, आदिवासी, महिला, अल्पसाखांक आणि इतर मागासवर्ग यांचे वाढते प्रमाण हि या समाजातील ब्राह्मणवादी, मनुवादी लोकांची डोकेदुखी

आज पर्यंत मोक्याच्या व माऱ्याच्या प्रशासकीय जागा ह्या केवळ ठराविक जातीच्याच कब्ज्यामध्ये आहेत, आजही दलित, आदिवासी, महिला, अल्पसाखांक आणि इतर मागासवर्ग या सर्वांचा कोठा प्रशासकीय, न्यायालीन व इतर उच्य पदावर जाणून बुजून भरलेला दिसत नाही. राजकीय जागा जरी आरक्षणातून मिळाल्या असल्या तरी दलित, आदिवासी, महिला, अल्पसाखांक आणि इतर मागासवर्ग यामधील लोक हे नामधारीच राहतात. वीस ते तीस वर्षाच्या शैक्षणिक क्रांतीच्या जोरावर आज दलित, आदिवासी, महिला, अल्पसाखांक आणि इतर मागासवर्ग या जमाती मधील लोक स्वताची प्रशासकीय आणि न्यायालीन जागा स्वताच्या कष्टावर मिळविण्यास सज्ज झालेत, हे १५% लोकांच्या, ब्राह्मणवादी, मनुवादी आणि सत्ताधाऱ्यानच्या डोक्याला झालेले पहिले दुखणे आहे.

महाराष्ट्रात अंधश्रधा निर्मूलनाचे काम चोखपणे पार पडून जाती अंताची लढाई लढणाऱ्या डॉक्टर नरेंद्र दाभोळ करांचा खून उघडपणे करून फिरणाऱ्या सनातनी लोकांची चौकशी व्हावी म्हणून रस्त्यावर येणारा हा शिक्षित समाजातील विद्यार्थी हाच पहिला होता, त्यानंतर कॉम्रेड गंगाधर पानतावणे यानाही आपल्या सूडाचा शिकार बनून देशामध्ये खरे बोलून सत्ताधारी व ब्राह्मणांचे पितळ उघडे पडले म्हणून हल्ला केला जातो, या सर्वांची लढाई लढण्यासाठी जो पहिल्यांदा रस्त्यावर उभा राहतो तो हा विद्यार्थी , पत्रकारांना तुम्ही खरे का छापता म्हणून धमकावणाऱ्या लोकांच्या विरोधात बोलणारा , आर. टी. आय. कार्यकर्त्यांना प्रोस्ताहन देणारा हा विद्यार्थी, भ्रष्ठाचाराच्या विरोधात उभा राहून कायदे सांगणारा हा पंडित विद्यार्थी त्याला न कोणती जात ना धर्म , हा नक्किच पिढ्यान पिढ्या उभे केलेले आमचे म्हणजे १५% सत्ताधारी वाल्यांचे विश्व उधवस्त करील याची सत्ताधारी व ब्राम्हणवादी यांना भीती आहे आणि हि फार मोठी इथल्या ब्राह्मन्वाद्याची आणि मानुवाद्याची डोकेदुखी आहे.

नाईलाजा मूळे सार्वजनिक ठिकाणी आम्हाला या लोकांच्या बरोबर काम करावे लागते, फिरावे लागते आणि इतर सार्वजनिक ठिकाणे एकत्रात वापरावी लागतात जी पूर्वीच्या काळी केवळ आमच्या ताब्यात होती. या सर्वाना कारणीभूत आहे ते केवळ दलित, आदिवासी, महिला, अल्पसाखांक आणि इतर मागासवर्ग या वर्गातील लोकांनी घेतलेले आणि याच वर्गातील लोकांनी घेऊ पाहिलेलं शिक्षण. हे शिक्षण हि सर्वात मोठी डोकेदुखी आहे तिला वेळीच मार्गी लावले पाहिजे हा पूर्वीपासून ब्राह्मण वादी लोकांचा व काही विशिष्ठ संघटनांचा मुख्य हेतू होता. सत्ता हातात आल्यावर ते मुळापासून नष्ठ करण्यासाठी देशातील नागरीका सोबत काम करणाऱ्या उच्च शिक्षण संस्था नष्ठ करण्याच्या हेतून एक एक डाव रचून राजकारण करताना चालूचे ब्राह्मणवादी व मनुवादी सरकार दिसत आहे.

आणि या सर्व डोकेदुखीच्या कारणासाठी एकच उपाय त्यांचाजवळ आहे तो म्हणजे ” शिक्षणाचा अधिकार नाकारणे.” ते लोकशाही मध्ये कठीण दिसत आहे मग समाज विकासाच्या शिक्षण देणाऱ्या या राष्ट्रींय संस्था बंद करणे किंवा त्यामध्ये विद्यार्थी कसे येणार नाहीत याची तरतूद करणे. एका दलित विद्यार्थ्याची एका राष्ट्रीय विध्यापिठामध्ये झालेला अन्याय अत्याचार व मानसिक त्रास आणि त्यामधून झालेली आत्महत्या हि या पुढे येणाऱ्या दलित, आदिवासी, महिला, अल्पसाखांक आणि इतर मागासवर्ग वर्गातील विद्यार्थ्याला विचार करायला लावणारी गोष्ट असून त्या बाबत त्याच्यामध्ये भीती निर्माण झालेली दिसते. जवाहरलाल नेहरू विध्यापिठाला राष्ट्रद्रोही म्हणून सत्तेचा व पैशांचा वापर करून मुख्य प्रसार माधमातून त्याचावर आरोप केला जातो व संपूर्ण विध्यापिठाला दोषी ठरवले जाते कारण या व यासारख्या विध्यापिठामध्ये विद्यार्थी शिकायला येऊ नयेत असाच प्रयत्न दिसत आहे. कारण ज्ञानी विद्यापीठे व ज्ञानी विद्यार्थी हे इथल्या ब्राह्मणवादी व मनुवादी विचारसरणीच्या लोकांचे सर्वात मोठे दुखणे आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना त्यापासून दूर ठेवणे व उच्च शिक्षणाची दारे त्यांच्यासाठी बंद करणे हाच या सर्व दुखण्या वरील रामबाण उपाय आहे. आणि त्याचाच उपयोग हैद्राबाद विध्यापिठामध्ये केल्याचे सातत्याने जाणवत आहे.

का राष्ट्रीय व राज्य विद्यापीठे आणि स्वायत: विद्यापीठे ज्याच्या मध्ये सामाजिक विज्ञानाचे (राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, ई.) शिक्षण देणारी विद्यापीठे यानाच निशाणा बनविला जात आहे?

राष्ट्रीय व राज्य विद्यापीठे आणि स्वायत: विद्यापीठे या सर्वाना घटनेच्या तरतुदी नुसार वागावे लागते आणि आरक्षणाचे संपूर्ण नियम नियमावली पाळावी लागते म्हणजे दलित, आदिवासी, महिला, अल्पसाखांक आणि इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांना घटने नुसार आरक्षण देऊन सर्व सोई सुविधा इतर सवर्णांच्या प्रमाणे देणे त्यांच्यावर बंधनकारक आहे, तसेच शिक्षकांना आरक्षणं नुसार भरती करणे, त्यांचे वेळेवर प्रमोशन करणे, या व अनेक गोष्ठी करणे भागच आहेत. या सर्वातून सुटका मिळवायची असेल तर आवाज उठविण्याऱ्याचे आवाज दबवीने हि इतिहास कालीन मनुवाद्याची राजनीती आत्ताचे सत्ताधारी करताना दिसत आहेत.

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय विद्यापीठ – JNU वरती एवढा राग का? आत्तापर्यंत स्वघोशीत संखेने प्रबळ असणाऱ्या या देशातील ब्राम्हणांच्या विद्यार्थी संघटनेला या पूर्वी विद्यार्थी राजकारणात यश आलेले दिसत नाही. या विध्यापिठात भारतातून सर्वच ठिकाणाहून विद्यार्थी व शिक्षक प्रतिनिधी भेटतात त्यातूनच हे सर्वजन स्वत:च्या भागामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्ठीवर प्रंबंध लिहून सामाजिक चळवळीमध्ये योगदान देऊन त्या विषयावर किंवा ज्वलंत प्रश्नावर काम करण्यास प्रेरित होतात किंवा मोक्याच्या किवा माऱ्याच्या जागा काबीज करतात.

दुसरी गोष्ठ म्हणजे पूर्वी राज्यातील किंवा जिल्ह्याच्या आंदोलने तिथेच सुरु होत आणि त्याच पातळीवर संपुष्ठात येत केवळ JNU सारख्या संस्थाना मध्ये ग्रामीण भागातून विद्यार्थी गेले आणि त्यांनी गावपातळीवरील प्रश्न थेट दिल्लीमध्ये उचलून धरले, आज पर्यत झालेल्या दिल्लीमधील लढ्यामध्ये सर्वात पुढे असणारे हेच विद्यार्थी आहेत ज्यांना प्रसार माध्यमे वेगळ्या पद्धतीने देश्याच्या समोर दाखवितात. भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाई असो किंवा निर्भया केस असो आजचा रोहित वेमुला किंवा पूर्वीची खैरलांजी या सर्व लढ्यात सहभागी असणारे विद्यार्थी सत्ताधारी सरकारला नेहमीच जाब विचारात असतात म्हणूनच कदाचित विध्यापिठाचा व विद्यार्थ्याचा आवाज दाबण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

विद्यार्थ्यांची नॉन नेट मानधन बंद करणे यामुळे विद्यार्थ्यांनी केलेल्या ऑकुपाई UGC या आंदोलनाला सर्व विद्यार्थी संघटनेने पाठींबा दिला आणि सध्याच्या सरकारच्या विरोधात खास करून शिक्षण व मानव अधिकार मंत्रालय याच्या नाकी नऊ आणले याचाही राग त्याच्या मनामध्ये असणे स्वाभाविकच आहे. या सर्व आंदोलनामध्ये पुढे असणारे विध्यापिठ जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय विद्यापीठ – JNU आणि त्याच्या पाठोपाठ हैद्राबाद राष्ट्रीय विद्यापीठ – HCU आणि इतर राष्ट्रीय विद्यापीठे यांना थांबवायचे असेल तर मुख्य विषयाकडून त्यांना दुसऱ्या दिशेकडे घेऊन जा हा पर्याय होता आणि तो आज सर्वाना दिसत आहे. लोकांच्यामध्ये अशांतता पसरून पुन्हा एकाधिकारशाही आणणे असच त्याचा मुळ उद्देश दिसत आहे किंवा कर्तव्यात कसूर करण्यासाठी केलेली हि दिशाभूल असली पाहिजे.

काय परिणाम आणि कोणाचे नुकसान?
खरतर हा केवळ विध्यापिठाचा प्रश्न होता कोणत्याही विध्यापिठामध्ये गैरकृत्य करणाऱ्यांच्या विरोधामध्ये तुरंत समिती नेमून त्याचावर कठोर कार्यवाही केली जाते, आणि त्याला विध्यापिठातून काढून टाकले जाते त्यानंतर तो कोठेही नोकरीसाठी किंवा शिकण्यासाठी अर्ज करू शकत नाही आणि तिच त्याच्या आयुष्यातील खूप मोठी शिक्षा असते. असो जर आपण परिणाम किंवा नुकसानाची गोष्ठ केली तर कोणाचे नुकसान होणार आहे. या सर्व विध्यापिठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे- कारण या न्यायाच्या लढाईत खांद्याला खांदा लाऊन उभे असलेले विद्यार्थी आपल्या शैक्षणिक वर्षाकडे फारसे लक्ष देताना दिसत नाहीत आणि कसे देणार रोज पोलिस दारामध्ये आहे रोज प्रसार माध्यमे नवनवीन प्रसार करतात आणि त्यामुळे जनतेच्या मनातील असंतोष्याला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे, अशा बऱ्याच कारणांमुळे सर्व विध्यापिठातील विद्यार्थ्याची मानसिक स्थिती विचलित झालेली दिसत आहे. तसेच या सर्वातून सर्वात मोठे नुकसान विध्यापिठाचे आहे कारण या काही दिवसात कोणीही राष्ट्र उन्नतीच्या संशोधनाचा कामाचा विचारही केलेला दिसत नाही. विद्यार्थ्याचे नुकसान म्हणजेच विध्यापिठाचे नुकसान आणि विध्यापिठाचे नुकसान म्हणजेच राष्ट्राचे नुकसान या सर्व प्रक्रियेमध्ये राष्ट्राचे फार मोठे नुकसान होत आहे पण यावर कोणीही बोलायला तयार नाही आणि जे कृत्य काही लोकांनी केले आहे त्याची शिक्षाही काहीच लोकांना झाली पाहिजे त्याला पूर्ण विध्यापिठ वाईट आहे असे म्हणणे म्हणजे शिक्षणाच्या प्रवाहातून या सर्वाना परावृत्त करणे होय.

माझा सारख्या प्रथमच शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आलेल्या विद्यार्थ्याचे फार मोठे नुकसान सत्ताधारी व प्रसार माध्यमे करत आहेत असे मला वाटते माझ्या गावामधून टाटा सामाजिक विद्यान संस्थेमध्ये शिकणारा मी पहिला विद्यार्थी आहे माझ्या समाजातील लोकांचे, माझ्या गावातील व जिल्यातील लोकांचे प्रश्न शासनाकडे मांडून त्यांच्या माध्यमातून सोडवण्याच्या एकमेव उद्देशाने मी उच्च शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आलो आहे, मुख्य प्रवाहातील शिक्षण घ्येण्यासाठी जो संघर्ष करावा लागत आहे तो तर वेगळाच परंतु या ज्वलंत प्रश्नांना सत्ताधारी लगेच उपाययोजना न करता दुसरीकडे लोकांचे लक्ष वेधण्याचे चाळे करत आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा मी या देशाचा नागरिक असून माझ्या मध्ये देशभक्ती ठासून भरली आहे याचे पुरावे द्यावे लागतात आणि न्याय हक्कासाठी पुन्हा पुन्हा मशाली हाती घ्याव्या लागतात. पण कधीतरी प्रश्न पडतो अरे भारत माता हि तुमची माझी आई आहे तर कधीतरी माझ्या आईलापण तुमची आई म्हणा, माझ्या बहिणीलापण तुमची बहिण म्हणा, माझा भाऊ रोहित वेमुला यालाही तुमचा भाऊ म्हणा आणि स्वताच्याच सरकार विरोधी यांनाही न्याय मिळावा म्हणून वन्दे मातरम म्हणून रस्त्यावर या! या संघर्षात माझ्या सारख्या नव्याने शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्याचे मनोधैर्य खचते आहे आणि साहजिकच वैचारिक चळवळी मधील माझ्या योगदानाला मूठमाती मिळते आहे.

जर इथल्या मनुवादी व ब्राह्मणवादी सरकारला या देशाची घटनाच बदलविण्याची असेल तर पहिल्यांदा अभिव्यक्ती स्वातंत्रावर गदा आणणे जरुरीचे आहे

शेवटी जर या स्वतंत्र देशामध्ये एकाधिकारशाही गाजवण्याची असेल तर या देशातील घटना उधवस्त केल्याशिवाय ते करणे शक्य नाही, बऱ्याच प्रसार माध्यामातून सनातनी लोकांनी हि घटना दलित, आदिवाशी, अल्पसाखांक, महिला आणि इतर मागासवर्ग यांच्या बाजूची असून ब्राम्हन्यवादाला विरोध करते म्हणून बदलविण्याचा विचार मांडलेला दिसतो. जर खरचे त्याचे अनुकरण करावयाचे असेल तर प्रथम लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणे हे ऐतिहसिक कृत्य आहे, बलणाऱ्याची तोंडे गप्पा करा बाकी सगळे तुमचे पाईक होतील म्हणूनच हि सुरवात दिसत आहे. या देशात तोडा फोडा आणि राज्य करा हि ब्राह्मण्यावादाची पूर्वीपासूनची ओळख आहे म्हणून विविधतेने नटलेल्या या देशात काही मुठभर लोकांच्या कृतीमुळे त्या समाजाला, त्या विध्यापिठाला, त्या धर्माला किंवा विशिष्ट एका जातीला वेठीशी धरून प्रचार प्रसार करणे म्हणजे खरतर देशात अराजकता व अशांती माजविण्यास खतपाणी घालण्यासारखे आहे. या देशामध्ये ९०% सैनिक हा दलित, आदिवासी, अल्पसंखांक आणि इतर मागासवर्गातील आहे आजही लढण्यासाठी, देश स्वच्छ करण्यासाठी, देशाच्या राष्ट्रीय खेळामध्ये, देशाच्या उदोगामध्ये महत्वाचे व मोलाचे योगदान देणार हा एकसंघ समाज केवळ १० ते १५ टक्के मनुवादी, ब्राहामान्वादी व सत्ताधारी लोकांच्या फायद्यासाठी ते या समाजाला विभागून त्यांचे न्याय, हक्क वेशीला टांगायला निघालेत. विध्यापिठ मध्ये रोहित वेमुला असा कायदा पारित झाला असता तर या सत्ताधार्याचे चमचे म्हणून काम करणारी संघटना बंद करावी लागली असती या भीतीने संपूर्ण विद्यापीठांना व विद्यार्थ्यांना बंदुकीच्या धारेवर आजचे सरकार धरू पाहत आहे व प्रसार माध्यमे त्याला खतपाणी घालत आहेत. खरयाचे खरे होण्यासाठी वेळ लागणार आहे तोपर्यंत देशामधील सुजाण नागरिकाने सुजाण पणे याच्याकडे बघावे. विकलेली प्रसारमाध्यमे आणि कलाकार नेत्यांवर विश्वास ठेऊन पुरोगामी महाराष्ट्राला स्वताचा गड करू पाहणाऱ्या ब्राम्हण वाद्याच्या डावपेचावर बारकाईने लक्ष ठेऊन जात, धर्म, पंत, भाषा याच्या नावावर हिंसक न होता शांततेने व जागरूकपणे सामोरे जावे अशीच अपेक्षा व्यक्त करतो. या देशातील उच्च शिक्षित विद्यार्थीच या देशाचे भवितव्य आहे असे असताना केवळ शांततामय आंदोलने करणाऱ्यावर राज्य पुरस्कृत आणीबाणी लागू करणे म्हणजे देशातील बुद्धिवंतांचा खून करणे व देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान करणे होय.

~~~

सुजित शांताबाई आनंदराव निकाळजे, बी.ए., एल.एल.बी., एम.एस.डब्लू. (दलित आणि आदिवासी समाजशास्त्र),(टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई) “शिक्षणाचा फायदा आर्थिक स्थर उंचावण्याबरोबर मानवतावाद आचरण करून पसरवण्यासाठी व्हावा.” या उद्देशाने व्यावसायिक शिक्षण घेऊनही केवळ समाजाचे प्रश्न वैज्ञानिकदृष्ट्या समजावून घ्यावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन आणि आंबेडकरी चळवळीमध्ये आयुष्य घालवलेले नवे आणि जुने सर्व पॅन्थर यांच्या संघर्षाला डोळ्यासमोर ठेऊन उच्च शिक्षणाची एक एक पायरी चढत प्रथम बी. ए. त्यानंतर एल. एल. बी. त्यानंतर एक वर्ष वकिली करून पुन्हा एम. एस. डब्लू. त्यामध्येही विशेषतः दलित आणि आदिवासी समाजशास्त्र -भारतामध्ये एकमेव ठिकाणी असणारा कोर्स टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई याठिकाणी पूर्ण केला आहे. एक विद्यार्थी