Round Table India
You Are Reading
जय भवानी-जय शिवाजी ते जय भीम-जय जोतिबा
0
Features

जय भवानी-जय शिवाजी ते जय भीम-जय जोतिबा

tejas 2 harad

 

तेजस हरड (Tejas Harad)

tejas 2 harad१४ एप्रिल म्हणजे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांची जयंती. आम्ही जिकडे राहतो त्या ठिकाणी अनेक शाळकरी मुले आहेत ज्यांचा आमच्या घरात सतत राबता असतो. मी जयंतीनिमित्त मुलांना सोबत घेऊन बाबासाहेबांच्या आयुष्यावर एक छोटेखानी नाटक बसवावं असा विचार केला होता पण ऑफिसच्या गडबडीत ते जमलं नाही. पण जयंतीच्या दिवशी एका मैत्रिणीच्या घरी जेवणाचं आमंत्रण होतं तिकडे जायचा योग आला. जेव्हा आम्ही तिच्या वस्तीमध्ये पोहोचलो तेव्हा तिकडे भव्य रॅली निघाली होती. सगळे धुंद होऊन ढोल आणि भीमगीतांच्या तालावर नाचत होते. आम्हीही दहा–पंधरा मिनिटांसाठी रॅलीमध्ये सामील झालो. जयंती सोहळ्यात भाग घेण्याची हि माझी पहिलीच वेळ. महाराष्ट्रात भीमजयंती म्हणजे महार जातीतल्या लोकांचा उत्सव असं समीकरण. कुणबी जातीत जन्मलेल्या माझं भीमजयंतीशी काही नातं असण्याचं कारण नव्हतं. महार जातीपासून तुम्ही जितके दूर तितका भीमजयंतीशी तुमचा संबंध दूरचा. पण आनंदाची गोष्ट म्हणजे जसजसं जातिव्यवस्थेबद्दलचं चर्चाविश्व विस्तारतंय तसं हे समीकरणही बदलतंय. शिवजयंतीबरोबर भीमजयंतीही एक मानाचा आनंदसोहळा बनत आहे.

माझा चारेक वर्षांपूर्वी फेसबुक–ट्विटरवर जातिव्यवस्थेबद्दल लिहिणाऱ्या लोकांशी संबंध आला, राऊंड टेबल इंडियासारख्या प्रकाशनाची ओळख झाली आणि जातीबद्दलची माझी जाणीव तीव्र व्हायला लागली. मी जातीकडे चिकित्सक वृत्तीने पाहायला लागलो, जातिव्यवस्थेबद्दल जमेल तेवढे वाचायला लागलो, माझ्या नेणिवा तपासून पाहायला लागलो. अर्थातच जेव्हा तुम्ही जात काय भानगड आहे हे पहिल्यांदा व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करता तेव्हा पहिली व्यक्ती समोर येते ती बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी जातीबद्दल विपुल लिहून ठेवलं आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे हे सर्व लिखाण सहज उपलब्ध आहे. मी बाबासाहेबांची जमतील तेवढी पुस्तके वाचून काढली, त्यांची भाषणे वाचली आणि त्यांना जेवढं समजून घेता येईल तेवढं समजून घेण्याचा प्रयत्न केला. अर्थात, ती प्रक्रिया अजूनही चालूच आहे.

माझ्यासारख्या व्यक्तीने बाबासाहेबांना वाचणं, त्यांच्याबद्दल बोलणं, त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करणं हे माझ्या जातीतील लोकांना थोडं विचित्र वाटेल. कारण त्यांच्यासाठी बाबासाहेब म्हणजे दलितांचे, आणि त्यातही महारांचे. जय भीम हे एक-दुसऱ्याला भेटल्यानंतर अभिवादन करण्याचे नाही तर हेटाळणीचे शब्द जे बऱ्याचदा विशेषण म्हणूनही वापरले जातात. जातीचं नाव घेणं सगळ्यांना अवघडल्यासारखं करतं, म्हणून मग “तो ‘जय भीम’ वाला आहे का” असं विचारलं जातं. माझ्यासाठी बाबासाहेबांना वाचायला सुरुवात करणे इथपासून ते अजिबात अवघडल्यासारखं न वाटून घेता जय भीम म्हणणे हा हि एक प्रवासच होता.

बहुजन समाज खूप मोठा आहे आणि बहुजन राजकारणाचे अनेक पैलू आहेत. छत्रपती शिवाजी राजांना सगळ्यांनी आपलंसं केलं आहे पण महात्मा जोतिबा फुल्यांना ते भाग्य तितकंसं लाभलं नाही. खरंतर महात्मा फुल्यांना समाजपटलावर ठेवण्याचे काम आंबेडकरी चळवळीनेच सगळ्यात जास्त केले आहे. आंबेडकरी चळवळीने शिवाजी महाराजांपासून जोतिबा, शाहू, अण्णाभाऊ सगळ्यांनाच जवळ ठेवलं आहे. शेतकरी कष्टकरी जातींचं दुर्दैव म्हणजे त्यांना महात्मा फुल्यांनंतर फुल्यांइतका प्रतिभावान नेता लाभला नाही त्यामुळे त्यांचं राजकीय शिक्षण अपुरंच राहिलं. महाराष्ट्राचं सुदैव म्हणजे तुकोबांची वारकरी परंपरा, जोतिबांची सत्यशोधकी परंपरा आणि त्यानंतरची आंबेडकरवादी परंपरा असं जातीविरोधी श्रीमंत विचारविश्व लाभलं आहे. शेतकरी कष्टकरी समाजाने आतातरी आपल्या ‘ठेवीले अनंते तैसेची राहावे’ विचारसरणीतून बाहेर येऊन आपण शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागे का ह्याबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात करायला हवी. त्यांनी जय भीमवाले असं कुत्सितपणे म्हणून दलितांची हेटाळणी करण्याऐवजी जय भवानी-जय शिवाजी बरोबर स्वतः जय भीम–जय जोतिबा म्हणायला सुरुवात करणेच त्यांच्या भल्याचं आहे.

जातीचे चटके सगळ्यांना सारखेच बसत नाहीत पण जातीनिहाय आपलं समाजातील स्थान ठरतं हे कोणीही नाकारू शकत नाही. संसद, मंत्रिमंडळ, न्यायपालिका व प्रसारमाध्यमे हे लोकशाहीचे चार स्तंभ मानले जातात. पण ह्या प्रत्येक स्तंभापासून शेतकरी कष्टकरी समाज किती दूर आहे ह्याचा प्रत्येक बहुजनाने विचार करावा. भारत म्हणजे जगातील सगळ्यात मोठे लोकशाही राष्ट्र असे म्हटले जाते पण येथील ८० टक्क्यांचा बहुजन समाज केवळ मतदार बनून राहिला आहे. जोपर्यंत जातीव्यवस्था अस्तित्वात आहे तोपर्यंत आपण भारताला लोहशाही राष्ट्र म्हणू शकत नाही. आपल्याला खरोखरच समताधिष्टित लोकशाही समाज निर्माण करायचा असेल तर बाबासाहेबांना वाचल्याशिवाय, त्यांच्या विचारांचे अनुयायी बनल्याशिवाय पर्याय नाही.

~~~

 

Tejas Harad is Copy Editor at Economic and Political Weekly and regularly writes on caste-related issues for various publications.